दारू तस्करी करणारी दोन वाहने ताब्यात घेऊन एका आरोपीस अटक, एक आरोपी वाहन सोडून पळाला !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
दारू बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या दारू घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी कार्यवाही करून एका आरोपीस अटक केली आहे. तर दुसरा आरोपी पोलिसांना पाहून वाहन सोडून पळाला. या दोन दारू तस्करांवरील कार्यवाहीत पोलिसांनी ९५ हजार रुपये किमतीची देशी दारू व दोन चार चाकी वाहन असा एकूण ६ लाख ४५ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातून लगतच्या दारू बंदी जिल्ह्यात होणारी दारू तस्करी रोखण्याकरिता पोलिसांनी विशेष मोहीम राबविली असून दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले आहे. दारू तस्करी करिता विविध शकली लढवणाऱ्या दारू तस्करांवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मालवाहू व इतर चारचाकी वाहनांमधून अवधरीत्या दारू विक्री करिता घेऊन जाणाऱ्या दारू तस्करांवरही पोलीस पाळत ठेऊन आहेत. काही ठरलेल्या दारू दुकानांमधून किंवा बार मधून मोठ्या प्रमाणात दारूची खरेदी करून लगतच्या दारू बंदी जिल्ह्यात पोहचविण्याच्या कामात अनेक हात गुंतले आहेत. दारूच्या दुकानांमधून कोणतीही शहानिशा न करता सहजतेने दारू मिळत असल्याने दारू तस्करांचे चांगलेच फावत आहे. काही दारू दुकाने व बार मध्ये तर तस्करांच्या फोनवर दारूचे पार्सल तयार करून ठेवले जातात. काही दारू दुकानदार व तस्करांच्या ऋणानुबंधाने शहरात दारू तस्करीचे व अवैध दारू विक्रीचे धंदे फळाफुलाला आले आहेत. तस्करीतून झटपट मालदार होण्याच्या लालसेने अच्छे अच्छे या धंद्यात उतरले आहेत. भाजीपाल्यासारखी गल्ली मोहल्ल्यात अवैध दारू मिळत आहे. कोवळ्या वयातील मुलेही मोठ्या प्रमाणात या धंद्यात उतरली आहेत. "ये मेरा एरिया है," म्हणत एवढं दारू विक्रेत्यांनी मोहल्ले वाटून घेतले आहेत. बड्या हस्तींचे त्यांच्या पाठीवर हात असल्याने ते चांगलेच निर्ढावले आहेत. वणी घुग्गुस मार्गावरील एका दारू दुकान व बार मधून सकाळ पासूनच अवैध दारू विकणारे दारूचा साठा घेऊन जातांना दिसतात. दारू दुकाने व बार मधून अवैध दारू विकणाऱ्यांना दारूचा साठा देणे बंद होणार नाही, तोपर्यंत अवैध दारू विक्रीवर अंकुश लावणे शक्य होणार नाही. पोलिसांनी अवैध दारू विक्रेते व तस्करांच्या कुंडल्या तयार करणे सुरु केले असून मागील काही दिवसांत दारू तस्करांवर कार्यवाही करून अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काल ११ फेब्रुवारीला पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या टाटा इंडिका MH ३४ AA ९३४३ व स्कॉर्पियो MH १४ AE ६९५९ या दोन वाहनांना ताब्यात घेऊन एका आरोपीला अटक केली आहे. स्कॉर्पियो चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. टाटा इंडिकाला बेलदारपुरा येथून तर स्कॉर्पियोला जन्नत हॉटेल जवळून ताब्यात घेतले. इंडिका चालक रामदास साधूजी निखाडे (३९) रा. बेलदारपुरा याला पोलिसांनी अटक केली आहे. तर स्कॉर्पियो चालक संदीप वाघमारे रा. प्रगती नगर हा वाहन सोडून फरार झाला. दोन्ही आरोपी विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. इंडिका मधून २३ हजार ४०० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. तर स्कॉर्पियो मधून ७१ हजार ८६४ रुपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली. दारू तस्करांवरील दोन कार्यवायांमध्ये पोलिसांनी देशी दारूसह दोन चार चाकी वाहन असा एकूण ६ लाख ४५ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहेत.