WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आलिशान कार ताब्यात घेऊन पोलिसांनी तीन तस्करांना केली अटक !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शहरांतुन होणारी दारू तस्करी रोखण्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून दारू तस्करांचे मनसुबे उधळून लावित तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकाने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आलिशान वाहनांना ताब्यात घेऊन दारू तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री छुप्या पद्धतीने आलिशान गाड्यांमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या कानावर आली. तेंव्हा पासून पोलीस तस्करांच्या मागावर होते. आज मध्यरात्री या आलिशान वाहनांमधून दारूची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्याने एसडीपीओ विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून मध्यरात्री २.१५ ते ३.३० वाजताच्या दरम्यान शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकावरून दारू तस्करी करणारी दोन चार चाकी वाहने ताब्यात घेऊन चंद्रपूर येथील तीन दारू तस्करांना अटक केली.

दारू तस्करी व अवैध दारू विक्रीचे शहरात चांगलेच प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेत तस्करांनी चांदी करून घेतली. तस्करीतून सहजतेने अमाप पैसा मिळत असल्याने आधी अपप्रवृतीच्या लोकांनी दारू तस्करीची कामे सुरु केली. दारू तस्करीच्या या धंद्यातून लफुटही मालदार झाल्याचे पाहून अच्छा अच्छांचे डोळे विस्फारले व नंतर पांढरपेशांनीही या धंद्यात उडी घेतली. आज दादा भाईंचा हात असणारे कित्येक लोक या तस्करीच्या धंद्यात उतरले आहेत. त्यामुळे शहरातून होणारी दारू तस्करी जिकडे तिकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. नवीन एसपींनी जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या शहर पोलिसांना सूचना दिल्याने पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम उघडली आहे. आज मध्यरात्री ३.३० वाजताच्या दरम्यान चंद्रपूर येथे अवधरीत्या दारू घेऊन जाणाऱ्या दोन आलिशान वाहनांवर पोलिसांनी कार्यवाही करून तीन आरोपींना अटक केली आहे. एसडीपीओ कार्यालयातील पोलीस पथकाला मध्यरात्री शहरातून आलिशान कारमधून दारूची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापाळा रचून शहरातून जाणाऱ्या वाहनांवर बारीक नजर ठेवली. मध्यरात्री शहरातील अशोका हॉटेल समोरून जाणाऱ्या MH २६ AK १००६ डस्टर कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात ९० मिली देशी दारूच्या शिशांचे १० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी २६ हजार रुपये किमतीची देशी दारू व ५ लाख रुपये किमतीची डस्टर कार असा एकूण ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कार्यवाहीत प्रगती नगर येथे संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या MH ०४ FA ०८७१ या मारोती सुझुकी रिट्झ कारची झडती घेतली असता त्यात ९० मिली देशी दारूच्या शीशांचे १९ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी ४९ हजार ४०० रुपये किमतीची देशी दारू व ३ लाख रुपये किमतीची कार असा असा एकूण ३ लाख ४९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दारू तस्करांवरील दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ८ लाख ८० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अजय मुरलीधर शर्मा (३२), राहुल संजूकुमार चवरे (२३) दोन्ही रा. महाकाली वार्ड चंद्रपूर, महेश धनराज कांबळे (३५) रा. भिहापूर चंद्रपूर या तीन दारू तस्करांना अटक केली आहे. त्यांच्यावर म.रा.दा.का. च्या कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, नापोकॉ विजय वानखेडे, इकबाल शेख, रवि इसनकर, इम्रान खान, पोकॉ संतोष कालवेलवार यांनी केली. या धडक कार्यवाहीमुळे तस्करांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share