अवैध दारू विक्री व तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एसडीपीओ पोलीस पथकाची धडक कार्यवाही !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या रडारावर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. ना ना विध शकली लढवून दारूची तस्करी करणारे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकु लागले आहेत. अवैध दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. अवैध दारूची विक्री व तस्करी होत असल्याची माहिती कानावर पडताच चपळतापूर्वक सापळा रचून पोलिस त्यांना बेळ्या ठोकत आहेत. अशाच शिरपूर व शिंदोला फाट्यावर दोन वेगवेगळ्या धाडी टाकून एसडीपीओ कार्यालयीन पोलीस पथकाने अवैध दारू विकणाऱ्या व दारूची तस्करी करणाऱ्यांना गजाआड केले आहे. २० फेब्रुवारीला रात्री ८ ते ११.३० वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने या दोन धडक कारवाया केल्या.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकाला शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिंदोला फाट्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीवरून शिंदोला चौपाटी येथे धाड टाकली असता तेथील बसस्थानकाजवळील पानठेल्या मागे आरोपी महेंद्र पंढरी राखुंडे (४२) रा. शास्त्रीनगर हा देशी दारूची विक्री करतांना रंगेहात सापडला. पोलिसांनी त्याच्या जवळून ५२०० रुपये किंमतीच्या ९० मिली क्षमतेच्या २०० नग दारूच्या शिश्या जप्त करून त्याला अटक केली.
दुसऱ्या कार्यवाहीत पोलीस पथकाने लगतच्या दारूबंदी जिल्ह्यात अवैधरित्या दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. वणी मार्गे चंद्रपूर येथे MH ०२ DA २८८९ या वाहनामधून दारूची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने एसडीपीओ कार्यालयीन पोलीस पथकाने शिरपूर बसस्थानकाजवळ वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सहा पेट्या विदेशी दारू आढळून आली. रात्री ११ वाजता पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीवरून हि धडक कार्यवाही केली. पोलिसांनी ४० हजार ३२० रुपये किमतीच्या दारूसह चार चाकी वाहन असा एकूण १ लाख ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी मो. सोहेल मो. अखिल (२६) रा. ताज नगर यवतमाळ व शेख खालिद शेख खालिल (२२) रा. अमननगर यवतमाळ यांना अटक केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध म.दा.का. च्या कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, नापोकॉ विजय वानखेडे, ईकबाल शेख, रवि इसनकर, आशिष टेकाडे, गुणवंत पाटिल, सुगत दिवेकर यांनी केली.