कोरोना पसरतो आहे पाय, पण आम्हाला त्याचे काय !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
देशाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह विदर्भातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागल्याने काही जिल्ह्यात सामुर्ण लॉकडाऊन तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषयक नियम कडक करून बाजारपेठांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. शहर व तालुक्यातही प्रशासनाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याच्या नागरिकांना सूचना दिल्या आहेत. कोरोना विषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगाही उगारण्यात आला आहे. सोमवार पासून बाजारपेठेची वेळही सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी व बाजारात गर्दी न करण्याचे आव्हानही करण्यात आले आहे. असे असतांनाही काल रविवारला बाजारपेठेत नागरिकांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. शहरात ठिकठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडविल्याचे पाहायला मिळत होते. तोंडाला मास्क न लावताच नागरिक गर्दीच्या ठिकाणी वावरत होते. बाजारपेठेत एकमेकांना खेटून वस्तूंची खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या मनात कोरोनाची जराही धास्ती न उरल्याचे पाहायला मिळत होते. नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा पूर्णतः विसर पडला असून त्यांना नियमांची सक्ती करण्याचा प्रशासनाकडून नित्यनियम पाळला जात नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. काल चिकन व मटण शॉपमध्येही नागरिकांची एकच झुंबड पाहायला मिळत होती. चिकन व मटण शॉपमध्ये नागरिकांची रिघ लागल्याचे पाहायला मिळत होते. सोशल डिस्टंसिंग न पाळता नागरिक एकमेकांना रेटून चिकन व मटण खरेदी करीत असल्याचे दिसून येत होते. नियमांना धाब्यावर बसवून नागरिक शहरात वावरतांना दिसत आहे. कोरोनाने परत एकदा पाय पसरायला सुरुवात केली असतांनाही नागरिक या आजाराला अगदी सहजतेने घेत आहेत. प्रशासनही एखाद्या मुहूर्तावर नियम न पाळणाऱ्यांवर कार्यवाही करून नंतर त्याकडे नजरअंदाज करीत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागल्याने प्रत्येक जिल्हा व तालुक्याला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनाही सावधानी बाळगण्याचे आव्हान करण्यात आले आहे. असे असतांनाही नागरिक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेत नसून प्रशासनही नियमांविषयी गंभीर झाल्याचे दिसून येत नाही. बाजारपेठेत नियमांना डावलून उसळत असलेली गर्दी कोरोनाला एकप्रकारे आमंत्रण देत आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असून विनामास्क नागरिक शहरात फिरतांना दिसत आहे. कोरोनाच्या नियमांना बगल देत नागरिक निडर होऊन गर्दीच्या ठिकाणी बिनधास्तपणे वावरत आहेत. प्रशासनही एखाद दिवस नियम न पाळणाऱ्यांवर थातुरमातुर कार्यवाही करून आपली सतर्कता सिद्ध करीत आहे. नागरिकांनाही प्रशासनाचा एक दिवसाचा बडगा असतो हे कळून चुकले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिकडे तिकडे भीतीचे वातावरण असतांना येथील प्रशासन सुस्त व नागरिक बिनधास्त असे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाची लाट शहरात परत येऊ नये याकरिता प्रशासनाने नागरिकांना कडक शिस्त लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून करण्यात येत आहे.