WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरात संसर्गजन्य आजारासह इतरही आजारांचा प्रकोप वाढला असतांना नगरपालिका प्रशासन स्वच्छतेबाबत उदासीनता दर्शवित आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येत असून नळांद्वारे घरोघरी येणारे पाणीही दूषित येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून निळगुडा नदीतून शहरात पाणी पुरवठा केला जात असून मागील काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत दूषित व गढूळ येत असल्याची नागरिकांमधून ओरड सुरु आहे. अनेक गंभीर आजार दूषित पाणी पिण्याने होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरु असल्याच्या भावना शहरवासियांमधून व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासन रोगराईच्या या काळात शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी शहरात दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.

शहरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली असून टायफाईड सारख्या रोगाची साथही शहरात सुरु आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढतांना दिसत आहे. सताड उघड्या असलेल्या नाल्या, त्यात साचलेली घाण, डुकरांचा मुक्त संचार, गल्ली मोहल्ल्यात व रस्त्यांच्या कडेला पडून असलेला केरकचरा आजारांना आमंत्रण देत असून अस्वच्छतेमुळे आजार आणखीच बळावत आहेत. त्यातल्यात्यात शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ लागल्याने "घरोघरी आजारी" ही परिस्थिती उदभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग दूषित पाणी आपल्या दारी हा उपक्रम राबवित असल्याचे दिसून येत आहे. शहराला पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून १५ कोटी रुपये खर्चून वर्धा नदीच्या रांगणा भुरकी डोहातून पाईपलाईन टाकण्यात आलेली असतांनाही निळगुडा नदीतून शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. निळगुडा नदीतील पाण्याचे शुद्धीकरण न करता सरळ नळाद्वारे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे हे दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असून याकडे नगरपालिकेने जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share