तालुक्यात आज आठ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोना या संसर्गजन्य आजाराने परत एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून तालुक्यात आज आठ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीच्या उपाययोजनांबरोबरच नियमांची सक्ती करण्याचीही आवशक्ता निर्माण झाली आहे. आज आठ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१८ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २२ वर पोहचले आहेत. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ११७१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी आहेत. तर २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज २३ फेब्रुवारीला ३२ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून त्यात आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज १४ व्यक्तींचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले असून नागरिकांनी योग्य ती घाबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनानेही कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची वेळीच काळजी घेणे जरुरी झाले आहे. नागरिकांना कोरोना विषयक नियम पाळण्याची सक्ती करणेही तेवढेच आवश्यक झाले आहे. कोरोनाचा परत उद्रेक होणार नाही याकरिता नागरिकांनी सावधानी व प्रशासनाने सावधान राहणे गरजेचे आहे.
तालुक्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या आठ रुग्णांमध्ये प्रगतीनगर येथील चार, जी.प. कॉलनी येथील दोन, सानेगुरुजी नगर येथील एक तर चिखलगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.