तालुक्यात वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण, मागील तीन दिवसांत १६ रुग्ण आढळले, उद्या तालुक्यात एक दिवसीय संचारबंदी लागू !

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. मागील तीन दिवसांत कोरोनाचे १६ रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने उद्या रविवारला शहरात संपूर्ण लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनली असून नागरिकांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत ठरत आहे. शहरात नागरिकांची वाढलेली गर्दी व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन कोरोना वाढीचे कारण ठरत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा बसावा याकरिता तालुक्यात एक दिवसाची संचारबंदी लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संचारबंदी काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीची दुकाने सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर गॅस एजन्सी, पेट्रोलपंप, दवाखाने, औषधी दुकाने सकाळी ९ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहतील. याव्यतेरिक्त संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार असून संचारबंदी दरम्यान विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. मागील तीन दिवसांत कोरोनाचे १६ रुग्ण आढळले आहेत. २५ फेब्रुवारीला पाच, २६ फेब्रुवारीला दोन तर २७ फेब्रुवारीला नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १२३९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ३५ वर पोहचले आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ११७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज ४० तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३३ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. ३५ ऍक्टिव्ह रुग्णांपैकी १४ रुग्ण कोविड केयर सेंटरला, ६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १५ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
मागील तीन दिवसांत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये प्रगतीनगर येथील तीन, जी.प. कॉलनी चार, चिखलगांव चार, सानेगुरुजीनगर एक, शास्त्रीनगर दोन, ढुमेनगर एक तर भालर टाऊनशीप येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.