WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोळसा वाहतूकदारांकडून देण्यात येणाऱ्या टार्गेटमुळे ट्रक चालकांमध्ये निर्माण झालेली ट्रिप मारण्याची स्पर्धा देत आहे अपघातास आमंत्रण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोळसा खदानींमधून कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमध्ये ट्रिप मारण्याच्या निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. कोळसा खदानींमधून रेल्वे सायडिंगवर कोळसा आणणाऱ्या ट्रकच्या जास्तीतजास्त चकरा लागाव्या याकरिता चालक सुसाट वाहने चालवून नागरिकांचा जीव धोक्यात आणत आहेत. वाहतूकदाराने दिलेले ट्रिपचे टार्गेट व टार्गेट पूर्ण केल्यानंतर वाहतूकदाराकडून मिळणारे बक्षिस ट्रक चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण करित आहे. जास्तीच्या ट्रिप लागल्यास जास्तीचे बक्षीस मिळेल व वाहतूकदाराची वाहवाही लुटता येईल या हव्यासापायी ट्रक चालक वाहतुकीचे सर्व नियम मोडीत काढत सुसाट वेगाने वाहने चालवितांना दिसतात. वाहनांची गती कमी होऊ नये याकरिता थोड्या थोडक्या जागेतून एकमेकांना ओव्हरटेक करीत, मागून पुढून येणाऱ्या वाहनांची वा रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्यांची कसलीही पर्वा न कारता कोळशाची ट्रिप मारण्याच्या धुंदीत ट्रक चालक लपर्वाहीने वाहने चालवितांना दिसतात. कोलारपिंपरी, पिंपळगाव, जुनाड व उकनी या कोळसा खदानी एकाच मार्गावर असून याच मार्गावर अनेक कापसाचे जिनिंगही आहेत. तसेच या रस्त्यालगत छोटी मोठी गावेही आहेत. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे या रस्त्यांवर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. अपघातात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक कास्तकारांची जनावरे अपघातात दगावली आहेत. तरीही ट्रिप मारण्याच्या नादात निष्काळजीपणे वाहने चालविणे थांबले नाही. मागून पुढून येणाऱ्या वाहनांना जराही जागा न देता ट्रक चालक अगदी रस्त्याच्या मधोमध वाहने चालवितांना दिसतात. काल एका जिनिंग मालकाची कार ट्रकची धडक होण्यापासून थोडक्यात बचावली. सुसाट वेगाने कोळसा घेऊन येणारा ट्रक कारला धडकणार तोच कार चालकाने प्रसंगावधान राखीत कार अगदीच रोडच्या कडेला वाळविल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही ट्रकचा व्हील बोल्ट कारला लागल्याने कारचे थोडेफार नुकसान झाले. नंतर कार मालकाने रस्ता रोखून धरल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला.

वाहतूकदारांचे ट्रक चालकांना दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकरिता व ट्रिपांवर ठरविलेले बक्षीस मिळविण्याकरिता ट्रक चालक सुसाट वेगाने वाहने चालवितांना दिसतात. छोट्या मोठ्या वाहनांना जराही जागा न देता धुंदाड वाहने चालविली जात असल्याने या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचा जीव नेहमी भांड्यात पडलेला असतो. ट्रक चालकांच्या निष्काळजीपणामुळे वणी उकनी मार्गावर कित्येक छोटे मोठे अपघात घडले आहेत. या मार्गावर रस्त्यालगत छोटी मोठी गावे असल्याने गावकरीही या सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची धास्ती घेऊन आहेत. कित्येक गावकऱ्यांची जनावरे ट्रक अपघातात दगावली आहेत. या मार्गावर किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. कोळसा वाहतूकदारांचे ट्रक चालकांना प्रोत्साहन मिळत असल्याने ते कुणालाही न जुमानता नियमांना धाब्यावर बसवून वाहने चालवित आहेत. वाहतूकदारांनी ट्रक चालकांमध्ये ट्रिप मारण्याची लावून दिलेली स्पर्धा रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बितत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share