"कोरोनाने पकडली आहे परत लय, कधी संपणार इथले भय", तालुक्यात आज आढळून आले आठ पॉझिटिव्ह रुग्ण !
तालुक्यात आज आणखी कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून सातत्याने कमी अधिक प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत आले आहे. तालुक्यात आज आठ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२५२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४६ वर पोहचले आहेत. सतत वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे बाजारपेठेची वेळ कमी करण्यात येऊन प्रशासनाने कोरोना संदर्भातील नियमही कडक केले आहेत. तोंडावर मास्क न लावनाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे. कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची प्रशासन सर्वोतपरी काळजी घेत असून जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचाही जिल्हा पातळीवर विचार सुरु असल्याचे संकेत मिळत आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचे देशात आगमन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहेत. तर तालुकाही वर्षपूर्तीच्या अगदी जवळ आला आहे. २० मार्च २०२० ला शहरात कोरोनाने पाय रोवला. परठिकाणावरून शहरातील नातेवाईकांकडे आलेले दोन व्यक्ती सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह निघाले. नंतर तालुक्यात कोरोनाचा जो उद्रेक झाला त्याने प्रशासनालाही हादरवून सोडले होते. चार सहा महिने कोरोनाने चांगलाच कहर केला. त्यानंतर काहीअंशी कोरोनाचे संक्रमण कमी झाले. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. निस्तारलेली कोरोनाची साथ परत उफाळून आल्याने नागरिक भयभीत तर प्रशासन चिंतीत आले आहे. गेला गेला कोरोना, आला आला कोरोना अशी परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळत आहे. कोरोनाची व्हॅक्सिन येऊनही कोरोनाचा धाक संपलेला दिसत नाही. " कोरोनाने पकडली आहे परत लय, कधी संपणार इथले भय " जो तो विचारतो आहे आता " लॉकडाऊनच काय," पूर्व पदावर जीवनमान येत नाही तोच कोरोनाने परत दहशत निर्माण केली आहे. बाजारपेठेच्या वेळा बदल्याने पुन्हा बेरोगरीचे वादळ घोंगावू लागले आहे. बाजारपेठेच्या वेळा बदल्यापासून रोजगारात मोठ्याप्रमाणात कपात झाली आहे.
तालुक्यात आज कोरोनाचे आठ रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५२ झाली असून ११८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४६ झाले आहेत. आज प्राप्त झालेल्या १९ तपासणी अहवालामध्ये ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले तर आज करण्यात आलेल्या १६ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४६ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २२ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत आहे, ८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १६ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भर्ती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये प्रगतीनगर येथील एक, चिखलगांव चार, भालर टाऊनशिप एक, झोला एक तर बोटोणी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.