तालुक्यात वाढत आहे कोरोनाचे रुग्ण, आज पाच व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले आहे. कोरोनाने परत उग्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या उपाययोजनानंतरही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गाव खेड्यातही कोरोनाने परत पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणे वावरण्याने कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता दर रविवारी एक दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. पण संचारबंदीतही नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात फिरतांना दिसत आहे. संचारबंदी असलेल्या दिवशीही शहरातील रस्ते गजबजलेलेच दिसतात. प्रशासनाची असलेली शिथिलता व नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२६२ झाली आहे. तर एक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २७ झाले आहे. आज आणखी पाच रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण १२१० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून गावखेड्यातही कोरोरणाने परत पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. नागरिकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे. पण तरीही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. आज ५४ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आज करण्यात आलेल्या ४५ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट पूर्णतः निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ३५ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २३८ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह २७ रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरला, २ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ८ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शास्त्री नगर येथील एक, सर्वोदय चौक एक, भालर टाऊनशिप एक, मारेगाव (कोरंबी) एक तर झोला येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याबरोबरच कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.