कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत आहे सातत्याने वाढ, आज आणखी व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या नियम व सूचनांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने तथा प्रशासन नागरिकांकडून नियमांचे पालन करून घेण्यास तत्परता दाखवत नसल्याने तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढतांना दिसत आहे. प्रशासन नियमांची सक्ती करण्यात नरमाई दाखवत असल्याने नागरिकही निष्काळजीपणे बाजारपेठेत वावरतांना दिसत आहे. कित्येक महाभाग तोंडाला मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त वावरत आहेत. परिणामी कोरोनाचे संक्रमण वाढीस लागून परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. मागील काही दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज ८ फेब्रुवारीला सहा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२६८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २९ झाले आहेत. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत १२१४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून कोरोनाने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना परत आपली पाळेमुळे घट्ट करू लागला असतांना प्रशासन अद्यापही बेसावध असून नागरिक बिनधास्त आहेत. आज १०७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज करण्यात आलेल्या १० रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज आणखी ९७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २२८ अहवाल अप्राप्त आहेत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह २९ रुग्णांपैकी २२ रुग्ण कोविड केयर सेंटरला, १ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६ रुग्ण यवतमाळ इतरत्र उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रवीनगर येथील एक, टागोरचौक एक, भालर टाऊनशिप एक, रासा एक, झोला एक तर बाबापुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचा कहर वाढू लागला असून नागरिकांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.