WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाढिव वीजबिलाचा प्रश्न अधांतरी असतांना विद्युत विभाग कापत आहे विज कनेक्शन !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये या उदात्त हेतूने संपूर्ण देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशवासीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असतांनाच संचारबंदीचे प्रयोग अद्यापही सुरु असल्याने नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आलेले नाही. लॉकडाऊन काळात नागरीकांना घरी बसण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने पदराला बांधलेला पैसाही घर खर्चातच खर्ची झाला. एकीकडे कोरोनाची धास्ती तर दुसरीकडे शासनाने घराबाहेर निघण्यावर लावलेली बंधने यामुळे रोजगाराची बिकट समस्या निर्माण होऊन नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहे. अशा या संकटाच्या काळात शासनाने थोडीही दयादृष्टी न दाखवता घरी बसलेल्या नागरिकांवर विविध कर व बिलांचा वर्षाव केला. त्यात विद्युत विभाग अग्रेसर राहिला आहे. विद्युत विभागाने कोरोना काळात न घेतलेल्या मीटर रिडींगची सरासरी वीजबिलं अशी काही नागरिकांच्या माथी मारली की, नागरिक बिलाची रक्कम पाहूनच चक्रावले. तीन ते चार महिन्यांची वाढीव वीजबिलं नागरिकांच्या हाती पडल्यापासून विजबिलात सूट मिळण्याची मागणी सुरु आहे. नागरिकांनी याबाबत अनेक निवेदने दिली असून विजबिलात सूट देण्याबाबत प्रमुख राजकीय पक्षांनी विज कार्यालयावर मोर्चेही काढले आहेत. कोरोना काळातील वाढीव विजबिलात सूट देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून वाढीव विजबिलाचा प्रश्न अधांतरीच असतांना विद्युत विभागाने गोरगरीब जनतेचे विज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. बेरोजगारीच्या अंधारातून वाट शोधणाऱ्या सामान्य नागरिकांच्या घरातही विद्युत विभागाने अंधार केला आहे. कोरोना काळातील वाढीव विजबिलाबाबत कोणताही निर्णय झाल्याशिवाय घरगुती विज कनेक्शन कापू नये अशी प्रमुख पक्षांची मागणी असतांनाही विजविभागाने कसलीही पर्वा न करता गोर गरिबांच्या घरातील विज कनेक्शन कापण्यास सुरुवात केली आहे. विद्युत विभागाचे अधिकारीही नागरिकांचे काही एक ऐकायला तयार नसून विज बिलाचे पूर्ण पैसे भरल्याशिवाय कनेक्शन जोडणार नाही, असा अडेलतट्टू पवित्रा त्यांनी घेतला आहे. नागरिक वीज कार्यालयाच्या चकरा मारत असून मुख्य कार्यालय ते घुग्गुस रोडवरील कार्यालय असा त्यांचा रोजचा प्रवास सुरु आहे. तीन ते चार टप्प्यात विजबिल भरण्याची तयारी असणाऱ्यांनाही अधिकारीवर्ग दाद देत नसून त्यांना ऑफिस टू ऑफिस नाचवत आहे.

लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्या नंतर जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोच काही भागात आणखी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रोजगार पाहिजे तसा उपलब्ध होऊ शकलेला नाही. अशाच एका बेरोजगारीची झळ सोसत असलेल्या युवकाचे घरगुती विज कनेक्शन कापण्यात आले आहे. गौरकार ले-आऊट येथे राहणाऱ्या युवकाचे कोरोना काळापासूनचे १२ हजार रुपयांचे विजबिल असून विजबिलात सूट मिळेल व उर्वरित विजबिल दोन टप्प्यात भरू या आशेवर तो होता. पण विद्युत विभागाने त्याच्या घरचे विज कनेक्शन कापून त्याच्या आशेवर पाणी फेरले आहे. विज कनेक्शन कापल्याने भांबावलेल्या युवकाने तीन टप्यात विजबिल भरण्याची तयारी दर्शवून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. पण त्यांनी ८ हजार रुपये भरल्याशिवाय विज कनेक्शन जोडणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली. तीन ते चार दिवस सदर युवकाने विज कार्यालयाच्या चकरा मारल्या. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्याने प्रमुख पक्षाच्या तालुका प्रमुखाकडेही आपली कैफियत मांडली. पण अधिकारीवर्ग त्यांचेही काही ऐकण्यास तयार नव्हता. मागील आठ दिवसांपासून सदर युवक अंधारात रहात आहे. बेरोजगारीच्या अंधारातुन मार्ग काढत असतांना घरातील वीजही कापली गेल्याने सदर युवक नैराश्यग्रस्त झाला आहे. अनेक नागरिकांची विज कनेक्शन कापल्या गेल्याने त्यांच्यावर नैराश्य ओढवले आहे. विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे कित्येक नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तसेच उष्णतेचा प्रकोप वाढला असतांना नागरिकांना घरी विज नसल्याने गर्मीत रहावे लागत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share