WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वा.सावरकरांनी स्वधर्म व स्वराज्याची ज्योत मनामनात पेटविली.....आशुतोष अडोनी यांचे प्रतिपादन...

Image

सागर मुने, वणी

शस्त्रांनी झालेल्या आघातावर औषध असते पण प्रज्ञेवर झालेल्या आघातावर औषध नसते. म्हणून हिंदुस्थानातील 1857 चे पाहिले स्वातंत्र्य समर संपल्यानंतर इंग्रजांनी आपल्याला निसत्व करण्यासाठी देशात इंग्रजी शिक्षण व शस्त्र बंदीचा कायदा लागू केला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीत आत्मभान विसरलेल्या निसत्व समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात स्वधर्म व स्वराज्याची ज्योत स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी पेटविली असे प्रतिपादन नामवंत लेखक व प्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोनी यांनी केले. ते येथील नगर वाचनालयात आयोजित 34 व्या वर्षातील हेमंत व्याख्यानमालेचे 2 रे पुष्प गुंफताना बोलत होते.

स्व. निर्मला वामनराव वैद्य ( परतवाडा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंजिरी व सुधीर दामले यांनी प्रायोजित नगर वाचनालयातर्फे आयोजित या दुसऱ्या पुष्पांच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश अणे हे होते. व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार, रंगनाथ सहकारी पतसंस्थेचे संचालक सुधीर दामले उपस्थित होते.

जयोस्तुते जयोस्तुते या विजय गंधेवार यांनी गायिलेल्या स्वातंत्रतेच्या जय गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बोलतांना आशुतोषजी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा महामेरू स्वा.विनायक दामोदर सावरकर हे होते. त्यांनी क्रांतिकारकासाठी पायवाट निर्माण करण्याचे काम केले. एक एक माणूस जोडून लढण्याची प्रेरणा व आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रासाठी पूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात समिधा झाल्याचे जगातील एकमेव उदाहरण आहे. 1857 चे स्वातंत्र्य समर हे षंढ पुंडांच बंड नव्हतं तर ते स्वातंत्र्याचं समर होत असे ठासून सांगून स्वातंत्रवीरांना लंडनच्या म्युझियम मधील 1857 च्या संदर्भातील कागदपत्रे तेथे जाऊन वाचून मुखोद्गत करून परत भारत भवनात येऊन सकाळी लिहून काढत होते. त्यासंबंधीचा इतिहास शोधून काढून 1907 साली स्वातंत्र्य समराच्या 50 व्या वर्षी हे पुस्तक आकारास आल्यामुळे आपल्याला या संग्रामची माहिती मिळाली नाहीतर हा संग्राम सुद्धा अज्ञात राहिला असता.

स्वा. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानला नेताना त्यांची पत्नी माई सोबतच्या 5 मिनिटाच्या भेटीला किड्या मुंग्या प्रमाणे संसार तर सर्वच करतात पण देशाच्या जीवनात दिवाळी साजरी होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवानाची होळी करावी लागेल असे म्हणणारा अतुलनीय प्रतिभेचा हा जन्मजात कवी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारत मातेच्या हाकेला ओ देऊन या यज्ञ कुंडात उडी घेतली. त्यानंतर ब्रिटिश शासक सावरकर कुटुंबाशी कसे वागले यापेक्षा या कुटुंबाशी स्वकीय कसे वागले हे महत्वाचे आहे. या कुटुंबाचा त्याग व दानत हे जगातील इतिहासातील एकमेव अद्वितीय उदाहरण आहे.

मृत्यूच्या दाढेत असतांना ' अनादी मी अनंत मी अवद्य मी असा ' असे आत्म्याच्या अमरत्वाचे काव्य जन्मते हे त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे प्रमाण होय. सावरकरांच्या समुद्रातील उडीमुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात झाले. या उडीमुळे एका देशाच्या पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. अंदमानातील जेलरला 50 वर्ष पर्यंत तुमचं शासन टिकेल का? अस विचारण्याचं धारिष्ट सावरकरांचं करू शकतात. आयुष्याच्या उत्तरार्धात देशातील हिंदू समाजाला हलवून जागे करण्याचे प्रयत्न, जातीभेदाच्या लागलेला रोग नाहीसा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हिंदू समाज बलवत्तर करायचा असेल तर त्याला विज्ञान निष्ठ बनावे लागेल. असे सांगून हजारो मराठी शब्दांची निर्मिती करणारा हा महापुरुष होता. त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील अग्निपरीक्षा द्यावी लागली. उत्कट देशभक्ती ही सावरकरांची ओळख होती.

अध्यक्षीय भाषण करतांना रमेश अणे म्हणाले की, सावरकरांनी मृत्यूवर विजय मिळवला ते मृत्यूजय होते. अंदमानच्या कैद्यांमध्ये सुद्धा क्रांतीची ज्योत पेटविली होती. या व्याख्यानाचे प्रास्ताविक माधव सरपटवार यांनी केले. सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व आभार सुधीर दामले यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share