WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Ind vs NZ : तब्बल १८ वर्षांनी आली भारतीय कर्णधारावर नामुष्कीची वेळ

Image

भारताने २-० च्या फरकाने गमावली कसोटी मालिका

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.

दरम्यान या पराभवामुळे कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामने हरणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी २००२ साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध अशाच पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तब्बल १८ वर्षांनी भारतीय कर्णधारावर अशी नामुष्कीची वेळ ओढावली आहे.

भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस १०३ धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. लॅथमने ५२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर टॉम ब्लंडलने आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. मात्र ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share