WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एकमेकांवर दगडफेक करून केली जाते होळी साजरी, गावकऱ्यांचा आहे अंधविश्वास

Image

मारेगांव तालुक्यातल्या बोरी गदाजी गावात रक्ताची होळी खेळली जाते

प्रतिनिधी/सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगाव- होळीची धुळवड म्हंटल की विविध रंग छटा आणि असंख्य रंगांनी माखुन गेलेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातले बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. मागील पन्नास वर्षापासून या गावात ही परंपरा चालू आहे. होळीच्या दिवशी या गावात तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून केली जाते. होळीच्या दिवशी गावात गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेत आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.

होळीच्या दिवशी सकाळी गावकरी मिळून प्रतिकात्मक शवयात्रा काढतात. त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन अंघोळ व पूजा विधि आटोपतात. त्यानंतर दोन-तीन भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन दगडांचा मारा सुरू करतात. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी दगडफेक सुरू करतात. ही दगडफेक तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्त बंबाळ होत नाही. प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र अजूनही सुरूच आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share