WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मतिमंद तरुणीचे अपहरण करून बलात्कारप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Image

सोलापूर : एका २२ वर्षांच्या मनोरुग्ण मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल हणमंत ऊर्फ हानमा बापू पडळकर (वय ५५, रा. सांगोला) यास पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप व ७० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यात दंडाची रक्कम वसूल झाल्यास पीडित तरुणीच्या हितासाठी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा तसेच तिचे रीतसर पुनर्वसन करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

या खटल्यातील पीडित तरुणी मनोरुग्ण असून शारीरिक विकलांग आहे. १७ जुलै २०१६ रोजी ती स्वत:च्या घराच्या परिसरात भटकत असताना अचानक गायब झाली. त्याचवेळी शंका म्हणून आरोपी हणमंत पडळकर याचाही शोध घेतला असता तोसुद्धा गावात सापडला नाही. दरम्यान, पीडित तरुणी ही सांगोल्यात आटपाडी रस्त्यावर नग्नावस्थेत आढळून आली. आपणास आरोपी हणमंत पडळकर याने आणल्याचे तिने जुजबी सांगितले. पीडित तरुणीची बहीण व इतर नातेवाइकांनी चौकशी केली असता आरोपी पडळकर याने पीडित तरुणीला घेऊन गेल्याचे उघड झाले. अधिक चौकशी केली असता पडळकर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पीडित तरुणीने त्याला साक्षीदारांसमोर ओळखले. तिने हावभाव व देहबोलीने आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानुसार सांगोला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपी अटक झाल्यापासून अद्यापि कारागृहात आहे.

पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब घेण्यासाठी सांगोल्यातील मतिमंद मुलींच्या शाळेतील शिक्षिकांसह दुभाषींची मदत घेतली. यात आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे आढळून आले. वैद्यकीय तपासणीतही बलात्कार झाल्याचा पुरावा आढळून आला. या खटल्याची सुनावणी पंढरपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे वैद्यकीय पुराव्यासह नऊ साक्षीदार तपासले. पीडित तरुणीही सज्ञान जरी असली, तरी ती बलात्काराच्या कृत्याला संमती देण्यास असमर्थ होती.

ती मनोरुग्ण व शारीरिक, मानसिकदृष्टय़ा विकलांग असल्याने तिच्या तोंडी पुराव्याखेरीज नव्याने दोषारोप ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने वाढीव कलमांसह दोषारोप ठेवण्यास मान्यता दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share