WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

करोनाग्रस्तांसाठी राज्यात एक हजार रुग्णालयं उपलब्ध, उपचारही मोफत.

Image

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात १ एप्रिलपासून एक हजार रुग्णालयं उपलब्ध होतील असं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितलं. याबाबतचा निर्णय शासनाने शनिवारी घेतला. करोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना रेशन कार्ड आणि स्वतःचा एक फोटो आयडी द्यावा लागेल. समजा रुग्णाकडे रेशन कार्ड नसेल तरीही अपवादात्मक परिस्थितीत त्याला उपचारांचा लाभ मिळू शकतो अशी तरतूदही या योजनेत आहे.

सुधाकर शिंदे यांनी सांगितलं की, ” महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सध्या ४९२ रुग्णालयांचा समावेश आहे. १ एप्रिलपर्यंत ही संख्या १ हजारावर जाईल. यामुळे ज्या रुग्णांना करोनाची लागण झाली आहे त्यांच्यासाठी या सगळ्या रुग्णालयांची सोय होईल. मात्र राज्य सरकार फक्त विशिष्ट रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नामांकित करु शकते. असा रुग्णालयांमध्ये जर इतर आजार झालेल्या रुग्णांना दाखल केले तर त्यांनाही इनफेक्शनचा धोका असतो.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सध्या लाभार्थींना दीड लाखापर्यंतचा आरोग्य विमा हा फॅमिली फ्लोटर पद्धतीवर उपलब्ध आहे. मात्र करोनासाठी रुग्णाला दीड लाखापर्यंतचा वैयक्तिक विमा मिळेल. यातही व्हेंटिलेटर, नॉन व्हेंटिलेटर श्वसनाचे विकार, मल्टी ऑर्गन फेल्युअर यांचा समावेश असेल. करोनाची लागण झालेल्या १०० पैके २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्या २० पैकी पाच रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागू शकते असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत समाविष्ट झालेल्या रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यास रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share