WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पठ्ठ्याने केला चक्क आठशे किलोमीटरचा पायी प्रवास

Image

मूळचा चंद्रपुरातील पठाणपुरा येथील रहिवासी अजय सातोरकर (वय ३२) रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे मजुरी करायचा. मात्र, टाळेबंदी जाहीर झाली. त्याच्याकडे असलेल्या पाच हजार रुपयांवर दिवस काढायला सुरवात केली. तेही संपले आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला.

चंद्रपूर : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांच्या वेदनांच्या थरकाप उडविणाऱ्या घटना पुढे येत आहे. कुणी टँकरच्या आत बसून प्रवास करीत आहे, तर कुणी उपाशीपोटी प्रवास करीत आहे. अशीच एक घटना आणखी पुढे आली आहे.

मूळचा चंद्रपुरातील पठाणपुरा येथील रहिवासी अजय सातोरकर (वय ३२) रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे मजुरी करायचा. मात्र, टाळेबंदी जाहीर झाली. त्याच्याकडे असलेल्या पाच हजार रुपयांवर दिवस काढायला सुरवात केली. तेही संपले आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. पनवेल ते चंद्रपूर असा तब्बल आठशे किलोमीटरचा प्रवास पायदळ पूर्ण केला. याप्रवासात त्याच्याकडे फक्त ३५० रुपये होते. त्यामुळे अर्ध्याहून अधिक प्रवास त्याने बिस्कीट खाऊन पूर्ण केला. गुरूवारी अजयने चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि विलगीकरण कक्षात रवानगी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला देशभरात लॉकडाउन घोषित केला. त्यावेळी अजय सातोरकर पनवेलमध्येच होता. कामावरून परतल्यानंतर त्याला लॉकडाउनविषयी समजले. मात्र, त्यातील गांभीर्य त्याला कळले नाही. जवळ पाच हजार रुपये होते. तो आणि त्यांच्यासोबतच्या इतरांनी दिवस काढायला सुरवात केली. परंतु, तुटपुंजी रक्कम लवकरच संपली. सोबतचे आपापल्या दिशेने रवाना झाले. अजयकडे केवळ ३५० रुपये शिल्लक होते. त्याच्यावर याकाळात उपाशी राहण्याची वेळ आली. शेवटी त्याचाही संयम सुटला. लॉकडाउनलाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आणि २ एप्रिलला सकाळी पाच वाजता पनवेलवरून पायदळ चंद्रपूरच्या दिशेने निघाला. रात्री ११ वाजताच पुणे गाठले. रेल्वे स्थानकाच्या बाजूला उघड्यावरच झोपला. ३ एप्रिल पुणे-अहमदनगर असा प्रवास केला.

एका दुचाकीस्वाराने चाळीस किलोमीटरपर्यंत सोडून दिले. ४ एप्रिलला अहमदनगरवरून भीमा कोरेगाव गाठले. एका दुकानाशेजारी बिस्कीटपुडा खाऊन रात्र काढली. ५ एप्रिलला औरंगाबाद गाठले. त्यानंतर ६ ते १४ एप्रिल या दरम्यान जालना, शेंदूरजना घाट, मेहकर, मालेगाव, वाशिम, पुसद, दिग्रस, उमरी असा त्याने पायदळ प्रवास केला. मिळेल त्याठिकाणी खायचे. उघड्यावरच झोपायचे. नाकेबंदी असल्याने मुख्यमार्ग चकवविण्यासाठी आडमार्गाचा आसरा घ्यायचा. वाटेत नदीत अंघोळ करायची. १५ एप्रिलला तो रात्री १०.३० वाजता वणी येथे पोचला. एका हॉटेल शेजारी रात्री काढली.

आता जिल्ह्याच्या सीमेत प्रवास करण्यासाठी काहीच तास शिल्लक होते. घरी पोहोचणार यामुळे तोही आनंदी होता. त्यामुळे १६ एप्रिलला अजय पहाटे साडे पाच वाजता वणी येथून पायदळ निघाला. वर्धा नदी घुग्घुस येथे सकाळी ११. ४५ वाजता पोचला. तत्पूर्वी, त्याने मित्राशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला होता. मित्राने पोलिसांना माहिती दिली आणि त्याला नदीवरच ताब्यात घेतले. जिल्ह्यात बंदी असताना दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्यांना परवानगीशिवाय येता येत नाही. त्याला घुग्घुस येथील रुग्णालयात आणले आणि चंद्रपूरला विलगीकरण कक्षात हलविण्याची तयारी सुरू केली. मात्र, अजयच्या जिद्दीला पोलिसांनाही सलाम केला. या प्रवासात तो एकटाच होता. मात्र, वेदनेचे त्याचे पाय साक्षीदार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share