WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनामुळे आता " दुल्हन कब लेजायेंगे " म्हणण्याची वेळ नवरदेवांवर आली आहे !

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा कालावधी वाढत्या रुग्णसंखेमूळे सतत वाढवावा लागत असल्याने दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात धुमधडाक्यात पार पडणाऱ्या लग्नसमारंभावर यंदा विरजण पडले असून विवाहयोग्य युवक युवतींचा लग्नाचा बार न उडाल्याने विवाह इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तसेच जमाव बंदीमुळे वराती न निघाल्याने मंगलकार्यालये व लॉन धारकांचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. काहींनी लग्न रद्द केले तर काहींनी कालावधी वाढवला तर काहींनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकले. त्यामुळे कधीकाळी क्वचितच होणारे आदर्श विवाह यावर्षी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाले. कमी खर्च व कमी वेळात उरकलेले लग्न तथा अडीनडीच्या परिस्थितीत पार पडलेल्या लग्नांचा प्रसारमाध्यमांनीही उल्लेख केल्याने काही विवाह यादगार ठरले आहे.

उन्हाळ्याच्या एप्रिल व मे महिन्यांमध्ये लग्नसमारंभाची रेलचेल असते. विध्यार्थ्यांच्या परीक्षाही या महिन्यात आटोपल्या असतात व शाळांना सुट्ट्याही लागलेल्या असतात. परंतु यावर्षी सारकाही कोरोनाला भेट चढलं आहे. लग्नाची धामधूम जाग्यावरच विरली असून ठरलेली लग्न कशी उरकायची या विवंचनेत लग्न घरची मंडळी दिसत आहेत. याचबरोबर जिल्ह्याबाहेर लग्न ठरलेल्यांना वधू मंडपी जाण्याकरिता शासनाची परवानगी मिळण्यास वेळ विलंब होत असल्याने त्यांच्यावर " दुल्हनिया कब लेजायेंगे " असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही परिवारांचा विवाह संबंधीचा वार्तालाप फोनवरच झाला असून विवाह जुळवण्याकरिता एकमेकांच्या घरी न जाता आल्याने विवाह इच्छुकांची पार निराशा झाली आहे.लग्नकार्य म्हटले तर खरेदी आलीच. त्यामुळे कपड्यांची दुकाने व सोन्याचांदीच्या दुकानांमध्ये कमालीची गर्दी दिसायची. टेलर व्यवसायिकांचेही हात रिकामे नसायचे.वाजनतंत्री, नवरदेवाचा घोडा, फुलहारे, कॅटर्स, मंडपडेकोरेशन, किराणा, भाजीपाला यांचेही व्यवसाय तेजीत असायचे. परंतु कोरोनामुळे लग्नसमारंभावरच गदा आल्याने यातील काही व्यवसाय पूर्णतः ठप्प पडले असून व्यावसायिकांवर चांगलेच आर्थिक संकट ओढावले आहे. तसेच यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही उपासमारीचे संकट ओढावले आहे. आता या वाढत्या लॉकडाऊनमुळे नवी लग्न जुळणे तर दूरच ठरलेली लग्ने केंव्हा पार पडतील हि चिंता विवाह इच्छुक युवक युवतींना लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share