WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

केशकर्तनालयांना परवानगी देण्याबरोबरच दुकानांच्या वेळापत्रकातही बदल जिल्हाप्रशासनाची नवीन नियमावली जाहीर

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला असला तरी लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा नॉन रेडझोन मध्ये आल्याने जिल्ह्यातील उद्योग व व्यवसायांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले असून आता सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत दुकाने सुरू राहणार आहे.तसेच मागील दिड महिन्यांपासून बंद असलेली केशकर्तनालयेही सुरु करण्यास जिल्हाप्रशासनाने सशर्त मंजुरी दिली असून ५० टक्के प्रवाशांसह बससेवा सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. हे आदेश २२ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार आहे.

देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनचा कालावधीही शासनाला वाढवावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या उदयोजक व व्यावसायिकांनी उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता शासन दरबारी तगादा लावल्याने लॉकडाऊनच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात बहुतांश उद्योग व्यवसायांना नियमांचे बंधन घालून लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली. जिल्हाप्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार लॉकडाऊन मधून सूट मिळालेल्या सर्व व्यावसायिकांना आता आपले व्यवसाय सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. तर शहरी व ग्रामीण उद्योगांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवा ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु असेल. तसेच बसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. सामाजिक अंतर व स्वच्छतेची खास करून काळजी घेण्याचे महामंडळांना बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यायाम करण्यासही ७ ते ९ हि वेळ देण्यात आली आहे.सार्वजनिक खुल्या जागेत सामाजिक अंतर राखून व्यायाम करण्यास सूट दिली आहे. ऑटोरिक्षा धारकांनाही १ + २ प्रमाणे ऑटो रिक्षा चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांनाही सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. शासकीय बांधकामे व खाजगी बांधकामांना सकाळी ७ ते सायं. ७पर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मागील दिड महिन्यांपासून बंद असलेली केश कर्तनालये सुरु करण्यास अखेर जिल्हाप्रशासनाने अनुमती दिल्याने नागरिकांच्या डोक्यावरील भार व सलून व्यासायिकांचा आर्थिक भार हलका होणार आहे. नाभिक बांधवांचा पारंपारिक व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर उदरनिर्वाहाचे चांगलेच संकट ओढवले होते. केशकर्तनालये सुरु करण्याकरिता नाभिक संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे मागण्या केल्याने अखेर त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत शासनाने सकाळी ९ ते सायं. ५ या वेळात केशकर्तनालये सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे सलून धारकांना काही अटीही दिल्या आहेत त्यामध्ये केशकर्तनालयात येणाऱ्या ग्राहकाने न्यापकीन अथवा टॉवेल स्वतः आणायचा असून न आणल्यास त्याचे केशकरतंन करू नये, दुकानात चारच व्यक्ती बसतील याची काळजी घ्यावी, केशकर्तकांनी आपल्या साहित्याचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, दुकानांच्या आवारामध्ये सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी, केशकर्तकांनी मास्क लावणे अनिवार्य आहे, यासह इतर अटींचा समावेश आहे. अटी व नियमांचे पालन न झाल्यास व्यवसाय बंद करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लग्नसमारंभ व अंत्यविधीला ५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहता येणार नाही. लग्नकार्य सकाळी ७ ते सायं. ५ वाजेपर्यंतच उरकायचे आहे. हॉटेल व रेस्टारंट व्यावसायिक घरपोच सेवा देऊ शकतील . त्यांना रेस्टारंट मधील भट्टी सुरु ठेवता येणार आहे. शाळा, कॉलेजेस, धार्मिक स्थळे, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, सभा संमेलने ही सार्वजनिक ठिकाणे बंद राहणार असून चित्रपटगृहे, शॉपींगमॉल, बार, व्यायामशाळा, जलतरण तलाव असे सामूहिक एकत्रीकरणाशी निगडित व्यवसाय सुरु करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share