WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हाजरी

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- अंगाला लाई लाई करून सोडणाऱ्या उष्णतेची दाहकता रविवारी शहरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने थोडयाफार प्रमाणात कमी झाली असून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास आकाश ढगांनी वेढले व रात्री अचानक मेघगर्जनेसह चांगल्याच पावसाच्या सरी बरसल्या. हवामान खात्याने १ जूनला केरळमध्ये पावसाचे आगमन होण्याबरोबरच ३० व ३१ मे ला मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील असे भाकीत केले होते. महाराष्ट्रात ८ जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याबरोबरच मान्सूनपूर्व पावसाचे अंदाजही वर्तवन्यात आले होते. त्यानुसार शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस पडल्याने वातावरण काही अंशी थंड झाले आहे. मे महिन्यात उष्णतेच्या चांगल्याच झळा जाणवू लागल्या होत्या. ४६ अंशापर्यंत तापमान वाढले होते. उष्णतेने प्रत्येक जीव होरपळून निघत असतांना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत उष्णतेची दाहकता कमी करतांनाच वातावरणात थंडावा निर्माण केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी दमदार पाऊस पडण्याबरोबरच सरासरीपेक्षा ५ टक्के पाऊस जास्त पडणार आहे. मान्सूनचे आगमनही वेळेतच होणार असल्याने शेतकरीवर्गासह उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असते. शेतीची कामे सुरु होतांनाच शेतमजुरांच्याही हाताला कामे मिळत असल्याने त्यांची लगबग सुरु होते. पावसाळा म्हटलं की बच्चे कंपनीचा आवडता ऋतु. याच काळात शाळा सुरु होतात. पावसाच्या सरीत भिजत शाळेतून परततांना काही वेगळीच मजा ही बच्चे कंपनी लुटतांना दिसतात. रेनकोट व छत्र्यांच्या दुकानांनी बाजार सजलेला असतो. घामाचे लोट वाहणाऱ्या शरीराला थंड गारव्याचा स्पर्श होत असल्याने मनही प्रफुल्लित होते. झाड वेलींसह प्रत्येक व्यक्तीही ताजातवाना होऊन स्फूर्तीने आपापल्या कामात गुंतल्या जातो. गरमीने होणारी चिडचिड दूर झालेली असते. ग्रामीण भागातील लोक आपल्या घरांची डागडुजी करण्यात व्यस्त झालेली असतात. पाणी कवलांमधून आत टपकू नये म्हणून ते कवलांची फेरफार करण्याच्या कामी लागतात. शेतीची अवजारे व बैलगाड्यांच्या दुरूस्तीलाही वेग येतो. मान्सूनपूर्व कामांची लगबग जिकडे तिकडे पाहायला मिळते. शेवटी पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतु असल्याने पावसाची सर्वच चातकासारखी वाट पाहात असतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share