मुंबई येथून शहरात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण, माहिती मिळताच प्रशासन हादरले
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-
शहरातील वणी वरोरा रोड वरील महावीर भवनासमोर वास्तव्य असलेल्या व्यक्तीकडे काही दिवसांआधी मुंबईवरून आलेल्या कुटुंबातील सदस्यांपैकी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे.
१२ जूनला मुंबईवरून एक कुटुंब शहरातील व्यक्तीकडे आलं. त्या कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवू लागल्याने ते नागपूर येथे तपासणी करीता गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याने त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा ताफा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी पोहचला. प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलीसांचा मोठा फौज फाटा पाहून नागरिकांचीही चाचपणी सुरु झाली. अशातच परठिकाणावरून आलेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची घटका काहींच्या कानावर पडताच ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने शहरवासियांमध्ये एकच खळबळ उडाली. आजपर्यंत कोरोनाचा शिरकाव न झालेल्या वणी शहरात बाहेरील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कोरोना पसरेल काय, ही भीती शहरवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. शहर व तालुका कोरोना मुक्त असल्याने नागरिकही बिनधास्तपणे शहरात वावरायचे, बाजारपेठेत मुक्त संचार करायचे. परंतु ही वार्ता पसरताच त्यांच्यावर दडपण जाणवत होते. प्रत्येक व्यक्ती एकमेकांना फोन करून याबाबत माहिती जाणून घेतांना निशब्द होत होता. प्रशासनाने येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरु केले असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना पळसोनी येथील कोव्हिड केयर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. महावीर भावनासमोरील निवासस्थानात हे रुग्ण आढळल्याने या परिसराबाबत प्रशासनाकडून कोणते खबरदारीचे उपाय योजले जातात हे लवकरच कळणार आहे.