छुप्या पद्धतीने खर्रे विकणाऱ्याला आज थेट एसडीओनीच पकडले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून सुगंधित तंबाखु व खर्रा विक्रीस प्रतिबंध लावण्यात आले असतांना छुप्या पद्धतीने शहरातील रस्ते न गल्लीबोळांमध्ये सर्रास खर्रा विक्री सुरु असून काही छोटे पानटपरी चालक तर काही बड्या पान सेंटर धारकांनी रोजंदारीने लावलेल्या अल्पवयीन मुलांकडून चढ्या किमतीने खर्रे विकल्या जात आहे. काही व्यसनी व्यक्ती त्यांच्याकडून बिनधोक खर्रे विकत घेत असतांनाचे चीत्र शहरात रोजच पाहायला मिळत असून यवतमाळच्या ताज्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास हे खर्रा विक्रेते करणी भूत ठरू शकतात. आज शहरात फळभाजी खरेदी करण्याकरीता गेलेल्या उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी प्रत्यक्ष एका अल्पवयीन मुलाला सर्रास खर्रे विक्री करतांना रंगे हात पकडले. त्याच्या जवळ एकंदरीत १४ खर्रे आढळून आले. मुलगा गर्दीचा फायदा घेत पळून गेला पण त्याच्या वडिलांचे नाव मात्र साहेबांनी जाणून घेतले आहे. ही बाब पोलीस निरीक्षकांना कळविली असून कार्यवाही करण्यास सांगितले आहे. आता या छुप्या पद्धतीने खर्रे विकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येणार असून अशा या खर्रे विकणाऱ्यांची गोपनीय पद्धतीने माहिती काढली जाणार असल्याचे एसडीओ शरद जावळे यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकणारे पान सेंटर व तंबाखुजन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आला असून खर्रे किंवा तंबाखुजन्य पदार्थ विकतांना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असतांना काही व्यक्ती व अल्पवयीन मुले रस्त्यांनी फिरून सर्रास खर्रे विकतांना दिसत असून व्यसनाधीन व्यक्तीही बिनधोक त्यांच्या कडून खर्रे खरेदी करतांना दिसतात. काही घरांमधून छुप्या पद्धतीने खर्रे विक्री सुरु आहे तर काही विक्रेते घरपोच खर्रे आणून देतात. अशाच प्रकारच्या खर्रा विक्री करणाऱ्याकडून यवतमाळात कोरोना पसरल्याचे ताजे उदाहरण असतांनाही शौक आवरला जात नसल्याने कोणत्याही प्रकारच्या परिणामाची तमा न बाळगता अनोळखी व्यक्तींकडूनही हे महाभाग खर्रे खरेदी करून आपली तलब भागावितांना दिसतात. खर्रा तयार करतांना व त्याची विक्री करतांना कित्येक हातांचा त्याला स्पर्श झालेला असतो याचेही भान त्यांना रहात नाही. तलब भागविण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा मात्र त्याठिकाणी विसर पडतो. आपल्यामूळ आपलं कुटुंब धोक्यात येऊ शकतं हे त्यांनाच कळतं ज्यांच्यावर नंतर हे संकट ओढावतं. प्रशासन दिवसरात्र एक करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लहान सहान गोष्टींकडेही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्याकरिता प्रशासन आपले संपूर्ण योगदान देत असतांना काही महाभाग व्यसनाच्या आहारी जाऊन याच्या त्याच्या संपर्कात येऊन कोरोना पसरविण्याचे कारण बनत असून प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरण्याचे काम करीत आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाला तेंव्हा पासून शहरातील उपाययोजनांबरोबर शहरवासीयांना सावधगिरीच्याही सूचना प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. शासनाची खबरदारीविषयीची कॉलर ट्युनही प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असतांना त्यांचे असे बेसावध वागणे शासन व प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करण्यासारखे आहे. त्यामुळे कोरोनाला पाय पसरण्यास जागा मिळेल असा बेसावधपणा नागरिकांतून होता काम नये हीच प्रशासनाची अपेक्षा आहे. नेहमी छुप्या पद्धतीने होणारी खर्रा विक्री आज प्रशासनाच्या डोळ्यासमोर आल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस निरीक्षकांना अशा या छुप्या पद्धतीने गावात खर्रे विकणाऱ्यांवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसेच या खर्रे विकणाऱ्यांची गोपनीय माहिती घेऊन त्यांना शोधून काढून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याचेही एसडीओ जावळे यांनी पोलिसांना सांगितले आहे.