जनता कर्फ्यू पाच दिवसांचा, नागरिकांनी वस्तूंचा साठा केला पाच महिन्यांचा ! शहरात खरेदी करिता नागरिकांनी केली एकच गर्दी
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात काल २७ जूनला एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेच्या निवासस्थानासभोतालचा परिसर सील करण्यात येऊन त्या महिलेच्या संपर्कातील ३२ व्यक्तींचे (हायरिस्क} नमुने घेण्यात आले आहे. आतापर्यंत कोविड सेंटरमध्ये १०१ लोकांना हलविण्यात आले. त्यापैकी ९९ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले. ७० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६४ व्यक्ती निगेटिव्ह तर ४ व्यकीतींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करीता पाठविण्यात आले. ३५ निगेटिव्ह व्यक्तींना कोविड केंद्रातून सुट्टी देण्यात आली. ४९ व्यक्ती सध्यास्थितीत कोविड केयर सेंटर मध्ये असून १२ व्यक्तींना वैद्यकीय कारणास्तव होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कातील इतरही व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु आहे.
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर पोहचली असल्याने शहरात उद्या २९ जूनपासून ५ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारात आज खरेदी करीता नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता दुकानांमध्ये नागरिक अक्षरशः तुटून पडले होते. प्रत्येक दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत होती. कालपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत होती. भाजीपाल्याचा तर आज दुष्काळ पाहायला मिळत होता. १ वाजेपर्यंतच अर्ध्याधिक भाजीपाल्यांची विक्री झाल्याने वेळेआधीच भाजीपाल्यांची दुकाने बंद होतांना दिसली. शहरात भाजीपाल्यासह प्रत्येक वस्तूंचे भाव आज वढारले होते. अंडे, मांस मच्छी पासून तर मद्य विक्रेत्यांपर्यंत सर्वांनीच चांगलीच भाव वाढ केल्याने जनतेची आज चांगलीचं लूट झाली. एका दोन दिवसा आधी मद्याच्या ७५० मी.ली. बॉटलवर ४० ते ६० रुपये छापिव किमतीपेक्षा जास्त घेणाऱ्या विक्रेत्यांनी आज अचानक १५० रुपयांची घसघशीत मार्जिन ठेवली. दारू विक्रेत्याकडे लांबच लांब रांग लागल्याने सोशल डिस्टंगसिंगचा पार फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते. पाच पन्नास लोकं एकत्रित आल्याचा गवगवा नेहमी होत असतांना मद्याच्या दुकानात लागलेली शेकडोची रांग ते ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर , याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. एका दिवसात जिनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, भाव विचारताच तोंडात बोटे टाकणारा सर्वसामान्य माणूस वस्तू न खरेदी करताच घराकडे जातांना दिसत होता. बहुतांश विक्रेत्यांनी अक्षरशः नागरिकांची आज लूट केली. कोरोनाच्या भितीतही कर्फ्यूची जास्त काळजी वाटल्याने नागरिकांनीही बाजार अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. त्यामुळे विक्रेत्यांचेही चांगलेच फावले. काही नागरिक तर किमतीही न विचारता फक्त वस्तू खरेदी करण्यावरच बार देत होते. गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर वेळोवेळी जाम लागत होते. एकूणच जनता कर्फ्यूने जनताच काळजीत आल्याचे पाहायला मिळत होते. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जनतेला ५ महिन्यांचा वाटत होता कि काय, अशा प्रकारे लोक बाजारावर तुटून पडले. त्याच्यात नागरिकांच्या खिशातून अतिरिक्त पैसा गेला व विक्रेत्यांच्या खिशांचे वजन वाढले. आज कोरोनाची जराही भीती नागरिकांमध्ये जाणवत नव्हती. जो तो खरेदी करण्याच्या लगबगीत सोशल डिस्टंगसिंगचेही उल्लंघन करतांना दिसत होता. एकंदर आज कर्फ्यूच्या काळजीने नागरिकांनी घरांमध्ये चांगलाच वस्तूंचा साठा केल्याचे यावरून लक्षात येते.