शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात तीन व्यक्ती निघाले पॉझिटिव्ह
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून आज आणखी दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. ४ जूनला शहरातील पेट्रोलपंप व्यावसायिक व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असतांनाच आज त्यांच्या कुटुंबातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनावरील तानही चांगलाच वाढला आहे. दोन्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना पळसोनी येथील कोविड केंद्रातून पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. पेट्रोलपंप व्यावसायिकाची जवळची नातेवाईक असलेली व्यक्ती त्यांच्याकडे काही दिवसांपासून रहायला होती तर त्यांनाच भेटण्याकरिता जळगाव येथून त्यांचा नातेवाईक आला होता. नातेवाईक परत गेल्यानंतर काही दिवसातच व्यावसायिक दाम्पत्याला ताप आल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला. परंतु ताप कमी होत नसल्याचे पाहून त्या दाम्पत्यांनी नागपूर येथे जाऊन कोरोनाची तपासणी करून घेतली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलवून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठवण्यात आले. आज १९ नमुन्यांपैकी ६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात त्यांच्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीसह अन्य एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून महिलेच्या चिमुकल्या बाळाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तसेच अन्य तीन व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. चिखलगाव रोडवरील रुग्ण राहत असलेल्या द्वारका नगरी अपार्टमेंट सभोतालचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित असून त्याठिकाणी प्रशासनातर्फे विविध खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आणखी व्यक्तींना ट्रेस करण्याचे कार्य सुरु असून संशयितांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात येत आहे. आज दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १२ वर पोहचला आहे. त्यापैकी ४ व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन आठवर आली आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी २ जण नागपूर येथे तर २ जण यवतमाळ येथे उपचार घेत होते.
शहरात काल ८ जुलैला एक व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज ९ जुलैला २ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनावरील ताणही चांगलाच वाढला आहे. शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून एकामागून एक नवीन रुग्ण आढळत असल्याने जनतेत भीती संचारली असून प्रशासनाचीही चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. २० जूनपासून ९ जुलै पर्यंत शहरात १२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून दिवसागणिक रुग्णांचा आकडा वाढतच आहे. ४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८ वर आली आहे. कोरोनाची नवीन साखळी तयार झाल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील संशयितांचा शोध घेतांना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.