WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, चर्मकार संघटनांची मागणी !

Image

प्रशांत चंदनखडे वणी :-

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवास्थानावर ७ जुलैला समाजकंठकांनी तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करून मौल्यवान वस्तूंची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागिरांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन समाजकंठकांनी दगडफेक करून सीसीटीव्ही, खिडक्यांच्या काचा, कुंड्या व इतर मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली. यात घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान त्यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. जगभऱ्यातील आंबेडकरी अनुयायांचे ते प्रेरणास्थान असून त्याठिकाणी असंख्य अनुयायी भेटी देत असतात. अशा या प्रेरणादायी वास्तूची तोडफोड झाल्याने आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. ही अतिशय खेदजनक घटना असून बाबासाहेबांच्या विचारांची प्रताडना करणारी ही घटना आहे. त्यांच्या विचारांशी सांगड घालणाऱ्या बहुजन समाजाची मने दुखावणारी ही घटना आहे. राजगृहावर झालेली तोडफोड ही केवळ राजगृहावरील तोडफोड नसून वैचारिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या प्रत्येक आंबेडकरी चळवळीची मोडतोड करण्याचा प्रयत्न आहे. अशा या निंदनीय घटनेचा चर्मकार संघटना निषेद करीत असून यातील दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात बंदचा फटका बसलेल्या चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागीरांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही चर्मकार संघटनांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share