खूप झाला आता कोरोना, विद्युत मंडळ म्हणते आता वीजबिल भरोना !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
आधी मंदीची झळ नंतर कोरोनाने घातली गळ, जनसामान्यांची झाली परवळ, शासनही तुटपुंज देतं आर्थिक पाठबळ आता कठीण झालं आहे चालवणं घर, अशीच परिस्थिती राहील का हो निरंतर, या वेदनादायक आकांतानं जगण्याची भीषणता मांडतांना सर्वसामान्यांचे पाणावलेले डोळे पाषाण हृदयालाही चिळकांड्या फोडून जातात. दोन सांजीच्या भाकरीची सोय करतांना हातमजुरांना कस लागत आहे, तर कधी एका सांजीला उपासमार सहन करावी लागत असल्याचं भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटाने हालाकीच्या परिस्थितीत जीवनाचा गाडा हाकतांना कुटुंबाच्या संगोपनाची जबाबदारी न पेलल्याने आर्थिक नैराश्येतून काही निष्पाप जीवांनी आत्मबलिदान दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. व्यवसाय बुडाले, कामधंदे मंदावले, रोजगार हिरावले, नोकऱ्या गेल्या, हातमजुऱ्या मिळेनाशा झाल्या, ही आगतिकता पत्कारूनही जीवनाचा संदर्भ शोधत अत्यंत दयनीय परिस्थितीत जीवन कंठत असतांना सामान्यजनांवर विद्युत महामंडळाने आर्थिक बर्डन लादले असून आवाक्याबाहेरची विद्युत बिले पाठवून त्यांना आर्थिक विवंचनेत टाकले आहे. मागील दोन महिन्यांपासून विस महिन्यांचे रेकॉर्ड तोडणारी विद्युत बिले जनसामान्यांकडे बॉम्ब पडल्यागत धडकत आहे. मागील चार महिन्यांत विजेच्या रोडावलेल्या मागणीतून निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईची भरपाई म रा वि म सामान्य जनतेवर अतिरिक्त भुर्दंड लादून तर पूर्ण करीत नाही ना ही एकच चर्चा आता रंगू लागली आहे. कोरोनामुळं जे लॉकडाऊन झालं, त्यात फक्त गरीबांचच हाल झालं. बाप घरी बसला, पोरगं बेरोजगार झालं, सार जिनच बेहाल झालं. त्यात विद्युत मंडळानेच का मागे राहावे, वाहती गंगा आहे त्यांनीही हात धूवून घ्यावे. गरिबांजवळ पैका तर आता शिल्लक राहिलेलाच नाही, शरीराचे अवयव तेवढे बाकी राहिले आहे, त्याचीच विल्हेवाट लावून आता बिल भरावे लागेल अशा संतप्तजनक तेवढ्याच मन हेलावणाऱ्या प्रतीक्रिया सामान्य जनतेमधून ऐकायला मिळत आहे. लॉकडाऊनला पाच महिने झाले, चार महिन्यांचे वीजबिल १७ हजार रुपये आले. महिन्याला हजार पंधराशे बिल यायचे, लॉकडाऊनमध्ये डबल धमाका झाला दिवाळीची ऑफर आत्ताच मिळाली, "चार महिन्यांच्या वीज बिलावर चार महिन्यांचं वीजबिल एक्सट्रा", ही ऑफर सामान्य वर्गाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. अख्या आयुष्यात एवढं वीजबिल आलेलं मी तरी बघितलं नाही अशा प्रतिक्रिया एका जेष्ठ नागरिकाने दिल्या आहेत.
लॉकडाऊन मधून सूट मिळाल्या नंतर विद्युत विभागाने नागरिकांना घरपोच बिले दिली. जून महिन्यात सरासरी बिल देण्यात आले तेही ५ हजारांच्या वरूनच आणी त्यानंतर जुलै मध्ये मीटर रिडींग नुसार बिले देण्यात आली तीही १० हजारांच्या आसपासच. मार्च ते जून या चार महिन्यात बहुतांश नागरिकांना १० हजारांच्या वरूनच वीजबिले आली. या चार महिन्यात ऑनलाईन बिले भरली त्याचा तर काही हिसाबचं लागत नाही. कित्येक उन्हाळे अनुभवलेल्या व्यक्तींना या उन्हाळ्यात विद्युत विभागाकडून जे चटके बसले त्याच्या जख्मा चांगल्याच खोलवर रुतल्या आहे. विद्युत उपकरणाचा अगदी अल्प वापर करणाऱ्या एका इसमाला यावेळी जे बिल आले ते पाहून त्याला स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यावर विद्युत विभागाची अवकृपा झाली आहे. अवाढव्य वीजबिले पाहून धास्तावलेली जनता याच विजेचे शॉक घ्यावे कि काय, इतपत चिडलेल्या मानसिकतेने उद्विग्न होऊन संतप्त प्रतिक्रिया देत आहे. आधीच आर्थिक झळा सोसत असलेल्या जनसामान्यांवर आर्थिक भार लादून त्यांचे कंबरडे मोडण्या इतपत त्यांची दैना करू नये ही एकच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.