शहरातील आणखी दोन व्यक्ती कोरोनामुक्त, तालुक्यातील ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले सहा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना या वैश्विक महामारीने सर्वत्र थैमान घातले असतांना वणी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र सुरुवाती पासूनच नियंत्रणात राहिली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शिताफीने शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यापासून तर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची योग्य काळजी घेण्या पर्यंत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने रुग्णसंख्येला उच्चांक गाठता आला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रशासनातर्फे वेगवेगळे उपाययोजनात्मक प्रयोग केले जात आहे. दररोज शहराचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शिक्षकांच्या ५२ टीम तयार करून शहरातील प्रत्येकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० हजारांच्या वर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून तपासणी मोहीम अविरत सुरु आहे. सध्या शहरातील तेलीफैल परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्र बिंदू बनला असून याठिकाणी तब्बल ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. २६ जुलैला पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेने प्रतिबंधित क्षेत्र लांघून २२ जुलैला एका मयतीत उपस्थिती दर्शविल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून ही गंभीर स्वरूपाची माहिती दडवून ठेवल्याने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाने ठाणेदारांना दिले आहे. पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या मयतीतील ६४ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. वणी येथे उपचार सुरु असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाला व एका महिलेला कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोविड केयर सेंटर मध्येच उपचार सुरु होते. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता सहा झाली असून शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे. कोविड केयर सेन्टर मध्ये सध्या ८१ व्यक्ती विलीगीकरणात असून ६४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. आजचे ६४ नमुने पकडून ९३ नमुन्यांचे अहवाल सध्या प्रलंबित आहे. सेवाग्राम येथे कोरोनाने मृत्यू पावलेल्या महिलेपासून पहिली साखळी तर ७० वर्षीय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णापासून या परिसरात दुसरी साखळी तयार झाली. प्रशासन तेलीफैलातील दोन्ही साखळ्या तोडण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असून दोन तीन दिवसांच्या विश्रांती नंतर याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चिंतेत आले आहे. त्यामुळे येथील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासनाला आता वेगळाच फार्मुला अमलात आणावा लागणार आहे. दाटीवाटीच्या तेलीफैल या परिसरात नकळत एखादा संशयित ट्रेस न झाल्यास त्याच्या पासून चांगलाच धोका निर्माण होऊ शकतो. तेंव्हा या परिसरातील प्रत्येक व्यक्तीची हिस्ट्री शोधून काढणे आता गरजेचे झाले आहे. नाहीतर उतरत्या क्रमात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येला आणखी चढता क्रम लागायला वेळ लागणार नाही. तालुक्यात सध्या सहा ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात एकंदरीत २६ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यातील १९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. एका बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तेलीफैल प्रतिबंधित क्षेत्र परिसरातील पॉझिटिव्ह महिलेने चोरून लपून एका मयातीत हजरी लावल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आल्याने तिच्या संपर्कात आलेल्या ६४ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढली असून तपासणी करिता पाठविलेल्या नमुन्यांचीही संख्या वाढली आहे. परंतु दोन व्यक्ती कोरोनमुक्त झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र कमी झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णानाची संख्या सहा झाली असून शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.