झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत आढळले कोरोनाचे तीन रुग्ण !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन तेथील आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीमध्ये परप्रांतातून रोजगाराकरिता आलेल्या ३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या चार झाली आहे. शनिवार २६ जुलैला परप्रांतातून सिमेंट प्लांट मध्ये रोजगाराकरिता आलेल्या या व्यक्तींची कोविड केयर सेंटर मध्ये तपासणी करून त्यांच्या हातावर कॉरंटाईनचे शिक्के मारून त्यांना कंपनीमध्येच कॉरंटाईन करण्यात आले होते. तसेच त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते. आज तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना यवतमाळ येथील आयसोलेशन विभागात हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील ४४ व्यक्तींना सिमेंट प्लांटमध्येच कॉरंटाईन करण्यात आले आहे. आज तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने झरीजामणी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. ३ जुलैला महादापूर येथील गर्भवती महिला कोरोनाने दगावली होती. त्यामुळे तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण तीन झाले आहेत. परजिल्हा व परप्रांतातून गाव शहरात येणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेणे आवश्यक झाले आहे. परठिकाणांवरून कंपन्यांमध्ये रोजगाराकरिता येणाऱ्या कामगारांची कोरोना टेस्ट करून अहवाल प्राप्त होई पर्यंत त्यांना कॉरंटाईन ठेवणे गरजेचे झाले आहे. काही मोठ्या कंपन्यांमध्ये परप्रांतातून कामगार येणे सुरु झाले असून कंपनी व्यवस्थापकांनी कोणत्याही बाहेरून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती लपवून न ठेवता त्यांची स्वतःहून तपासणी करून घ्यावी. अन्यथा त्या व्यक्तीपासून इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाचे संकट परतविण्या करिता सर्वांनी एकजूट दाखवून शासनाने ठरवून दिलेल्या खबरदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.