शहरातील आणखी दोन रुग्ण झाले कोरोनमुक्त तर १६ नमुन्यांचे अहवाल आले निगेटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचे जाणवत आहे. काल दोन व्यक्ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्या होत्या तर आज दोन मुलामुलींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना कोविड केयर सेंटर मधून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४ झाली आहे. तालुक्यातील एकूण २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४ वर आला आहे. तर १६ नमुन्यांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. शहरात २६ जुलैला तेलीफैल परिसरातील एक स्त्री व एक पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने शहरातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून तेलीफैल परिसरात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने तेलीफैल कोरोना संक्रमणाचे केंद्र बिंदू बनला असतांनाच प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली असून शहरात कोरोनाचा उद्रेक झाला नाही. प्रशासनाने सतत रुग्ण आढळत असलेल्या तेलीफैल परिसरावर लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी उपाययोजनात्मक कृती आराखडा तयार करून या परिसरातील नागरिकांची विशेष काळजी घेतल्याने रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविता आले. शहरातील तेलीफैल परिसरात एकामागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये याकरिता बाजारपेठेची वेळ कमी करण्यात येऊन प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची विशेष दक्षता घेण्यात आली. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता वेगवेगळे नियोजन करीत असतांना नागरिक मात्र बेजाबदारीने वागून प्रशासनाच्या उपाययोजनात्मक धोरणांना हरताळ फासत आहे. एका महिलेने तर बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून प्रतिबंधित क्षेत्र लांघून सरळ ती अंतयात्रेत सहभागी झाली. २२ जुलैला तिने मयतीला हजरी लावली व २६ जुलैला ती पॉझिटिव्ह निघाली. प्रशासनाच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने तिच्या संपर्कात आलेल्या शोक सभेतील ६४ व्यक्तींना हुडकून काढत प्रशासनाने त्यांना कोविड केंद्रात हलवून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविले आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर तैनात असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत ती बाहेर पडलीच कशी, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजनांची बरसात करीत असेल तरी ही नागरिकच बेजबाबदारपणे वागत असतील तर कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता करण्यात येणारे सर्वच प्रयत्न निरर्थक ठरतील. त्यामुळे कोरोनाला शहर व तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता नागरिकांनी एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहर प्रशासन, नगरपालिका प्रशासन व आरोग्य प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनी कोरोनाची साथ आटोक्यात आली असून नागरिकांनी आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे आता तरी दर्शन घडवू नये हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
काल शहरातील ६५ वर्षीय वृद्ध व एका महिलेला कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली होती. आजही एक १३ वर्षीय मुलगी व १० वर्षीय मुलगा कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना कोविड केंद्रातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४ झाली आहे. तीन रुग्ण कोविड केयर सेंटरला भर्ती असून एका महिलेवर नागपूर येथे उपचार सुरु आहे. शहरातील कंटेनमेंट झोन कमी होऊन ४ झाले आहेत. कोरोनाच्या तपासणी करीता पाठविण्यात आलेल्या ९३ नमुन्यांपैकी १६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ७७ अहवाल प्रलंबित आहे. कोविड केयर सेंटरमध्ये सध्या ७२ संशयितांना ठेवण्यात आले आहे. शहरातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.