राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी
मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या गाईडलाइंसमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच. दरम्यान, देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे