प्रशासनाची भंबेरी उडविणारा बाधित रुग्ण अखेर मदनापूर शिवारात सापडला
३० जूलै,...
मारेगाव येथील कोविड सेंटर मधुन बुधवारला कोरोना बाधित रुग्णाने पोबारा केल्याने प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली होती. रुग्ण शोधण्याचे आव्हान ठरत असतांना गुरुवारी सकाळी धामणी मदनापूर शिवारात बैलाच्या गोठ्यात दडुन बसलेला रुग्ण शेतकर्यांच्या लक्षात येताच पोलिस पाटलास कळवित प्रशासनास माहिती दिली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कोविड सेंटर मध्ये दाखल केले अन प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
येथील कोविड सेंटर मधुन मारेगाव तालुक्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाने प्रशासनाची नजर चुकवीत बुधवारी सकाळी काढता पाय घेतला. त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळखळ उडाली. दिवसभर शोध मोहीम राबविण्यात आल्यानंतर प्रशासनाची आणि नागरिकांची चांगलीच धाकधूक वाढली होती.रुग्णाच्या नातेवाईक सह तालुक्यात पालथे घालतांना प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली होती.
गुरुवार ला सकाळी धामणी मदनापूर शिवारात असलेल्या शेतातील गुरांच्या गोठ्यात दडुन बसलेल्या रुग्णास शेतकरी भयभीत झाला. लगेच पोलिस पाटलास माहिती देत पोलिसांना कळविले. पोलिस निरिक्षक जगदीश मंडलवार यांच्या पथकासह रुग्णवाहीका त्या ठीकाणी दाखल होवुन या बहुचर्चित रुग्णास ताब्यात घेतले. कोविड सेंटर ला दाखल केल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. या पुढे मात्र प्रशासनास खबरदारीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. एवढे मात्र खरे.
संपादन- दिपक डोहणे मारेगाव, यवतमाळ