घोन्सा येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ३९ झाले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे लोन पसरायला लागले असून तालुक्यातील राजूर (कॉलरी) व चिखलगाव नंतर घोन्सा येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. घोन्सा येथील एका महिलेचा आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. २३ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून एका कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३३ निगेटिव्ह तर घोन्सा येथील एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच ग्रामीण भागातही कोरोनाचं जाळं पसरताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाची चिंताही वाढली असून उपाययोजना करतांना आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ होतांना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोना चोर पावलाने दाखल होतांना दिसत असून आता पर्यंत राजूर (कॉलरी) येथे दोन, चिखलगाव येथे एक तर आज घोन्सा येथे एक कोरोना बाधित महिला आढळून आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढून ३९ वर पोहचला आहे. यापैकी २३ रुग्ण पूर्णतः बरे झाले असून एक महिला दगावल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण १५ झाले आहेत. १२ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती आहेत तर ३ रुग्ण यवतमाळ येथे उपचार घेत आहे. आज ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले त्यात एक महिला पॉझिटिव्ह तर ३३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ५८ नमुने तपासणी करीता पाठविण्यात आल्याने एकूण १७७ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.