गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग
प्रशांत चंदनखेडे वणी :-
अमरावती बोर्डाचे १२ विच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करणे सुरु झाले असल्याने आज ४ ऑगस्टला शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच लगबग पाहायला मिळत होती. कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षांचे निकाल फारच उशिरा लागल्याने पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विध्यार्थ्यानी गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. एकतर परीक्षांचे निकाल वेळाने लागले दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्याने विद्यर्थी चिंतेत पडले आहे. पुढील अभ्यासक्रमाचे सत्र केंव्हा सुरु होईल याची निश्चिती नसली तरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने ऑनलाईन फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांच्या गुणपत्रिकांचे वाटप लो.टी. महाविद्यालयामधून करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे शिक्षणाचा पार खोळंबा झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे काही विषयांचे पेपर बाद झाले तर कित्येक पदवी परीक्षाच बाद करण्यात आल्या. पदवी परीक्षांचा वाद रंगत असून युजीसी परीक्षा घेण्यावर ठाम आहे तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जोखीम पत्करायला तयार नसल्याने हा वाद आता न्यायालयापर्यंत गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. लॉकडाऊन लागू होण्याआधी १२ विच्या परीक्षा संपल्या होत्या तर १० विचा भूगोलाचा पेपर राहिला होता. अखेर भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सरासरी मार्क देण्याचे ठरले. या सर्व घडामोडीत विद्यर्थ्यांचं लक्ष लागलं होतं ते निकालाकडे, परंतु निकालाच्या तारखा बदलत गेल्याने विद्यर्थी हैराण झाले असतांनाच अखेर निकालाचा शुभ मुहूर्त सापडला व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता १२ विच्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु झाले आहे. शहरात ४ ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु राहणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान झाले असून यशाचे शिखर गाठून उज्वल भविष्याची पायाबांधणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निराशेचे सावट पाहायला मिळत आहे. नवे शैक्षणिक पर्व केंव्हा सुरु होईल याची शाश्वती नसली तरी विविध अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर ऑनलाईन वर्गही सुरु होईल. पण ज्या पालकांनी पोटाला चिमटे घेऊन पोट तिडकीने शिकविले अशा विद्यर्थ्यांना काही कारणास्तव ऑनलाईन शिक्षण मिळू न शकल्यास त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. शेवटी सर्वच क्षेत्रावर कोरोनाने प्रभाव टाकला असून देशातील एकूणच परिस्थिती बिकट झालेली पाहायला मिळत आहे.