देशी दारू दुकानातील चोरी प्रकरणी नऊ आरोपींना अटक, पोलिसांनी अतिशीघ्र लावला छडा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील तेलीफैल परिसरातील रुग्णालया जवळ असलेल्या सतीश भय्यालाल दानव यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानातून १६ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशी दारूच्या ४० पेट्या (१९२० नग) चोरीला गेल्याची तक्रार २ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच डी बी पथकाने तपासचक्रे फिरवून अतिशीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावून ९ आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. तसेच त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुकानात काम करणारा अतिविश्वासू कर्मचारीच या चोरीचा मास्टर माईंड निघाल्याने व्यावसायिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिक तेलीफैल परिसरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या एस.बी. दानव देशी दारू दुकानातून १६ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशी दारूच्या ४० पेट्या (१९२० नाग) चोरीला गेल्याची तक्रार पांढरी डोमाजी मेश्राम (५६) रा. रंगनाथ नगर यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार दाखल होताच डी बी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेऊन अतिशीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावून नऊ आरोपींना जेरबंद केले आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम लावत गुन्हेगारांना पोलिसी हिसका दाखवण्याबरोबरच शहरातील वातावरण शांततामय ठेवण्याचा पोलिसांनी नेहमी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन काळात कोरोना योध्यांची भूमिका बजावतांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबरच शहरातील गुन्हेगारीही नियंत्रणात ठेवण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. चोरी प्रकरण असो की अवैधधंदे असो की मग गली मोहल्ल्यात भरणारा जुगार असो या सर्व अप प्रवृत्तींना फोफावू न देता पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवरत गुन्हेगारांना पोलीस स्टेशनची हवा चाखविली आहे. या चोरी प्रकरणाचाही नेहमीच्याच अंदाजात अतिशीघ्र छडा लावून आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये गणेश भूमण्णा संगतीवार (३४) रा. दामलेंफैल वणी, उमेश उत्तम मडावी (२९) रा. रंगारीपुरा, भारत उर्फ पिंटू दुर्गन्ना रामगिरवार (३४) गायकवाड फैल, राजू मारोती अलीवार (२१) रा. गायकवाड फैल, अमर रामलाल कनकुंटलवार (३०) रा. दामलेफैल, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे (१९) रा. दामलेफैल, रामेश्वर मनोहर साळुंखे (३२) रा. गोकुल नगर, पवन गणेश मेश्राम (२५) रा. रंगनाथ नगर, राकेश ज्योतीराम किन्नाके (२०) रा. खरबडा मोहल्ला, यांचा समावेश असून त्यांच्याकडून देशी दारूच्या २५ पेट्या (१८० मिलीचे १२०० नग शिश्या) अंदाजे किंमत ६० हजार ४६४ रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, टाटा सुमो क्रमांक MH २३ E ८८१६, लोखंडी रॉड असा एकूण ६ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंविच्या कलम ४५७,३८० ३८१, ४११,१८८,२६९, व सहकलम ३,४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच भारत उर्फ पिंटू दुर्गन्ना रामगिरवार, रामेश्वर मनोहर साळुंके, राजू मारोती अलीवार, अमर रामलाल कनकुंटलवार, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे यांना यांना तुरंगात पाठवण्याचा आदेश झाला असून बाकी आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदर कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे पंकज उंबरकर यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.