WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर, आणखी तीन रुग्ण झाले कोरोनातून बरे !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. शहरातील तेलीफैलात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने आधीच प्रशासन चिंतेत आले असतांना ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढतांना दिसून आला. अशाही परिस्थितीत प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवत शहर व तालुक्याला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून सोडले आहे. तालुक्यातील आणखी तीन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. तालुक्यातील ४० कोरोना बाधित रुग्णांपैकी ३७ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन वर आली आहे.

शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने विविध उपाययोजनात्मक प्रयोग केले. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता प्रशासनाने वेगळाच फार्मुला तयार करून कंटेनमेंट झोनवर बारकाईने लक्ष ठेवले. कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित केल्याने रुग्ण वाढीस आळा बसला असून कोरोनाची साथ निवळू लागली आहे. ४० रुग्णांपैकी ३७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आज आणखी ५८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ३२ रॅपिड अँटीजेन चाचणीचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. मागील चार दिवसात २४८ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. २२१ नमुन्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. सध्यस्थितीत २८ व्यक्तींना कोविड केयर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काल यवतमाळ येथे पॉझिटिव्ह आढळलेला एक व्यक्ती तर घोन्सा येथील एका महिलेचा समावेश आहे. दोन रुग्णांपैकी एकावर कोविड केयर सेंटरमध्ये तर एकावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. तालुका कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असून नागरिकांनी कोरोनाला समूळ नष्ट करण्याकरिता सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share