तालुक्यातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण, पॉझिटिव्ह रुग्ण झाले ६७
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचे संक्रमण वाढतांना दिसत असून आज आणखी चार व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वणी वरोरा रोडवरील वरध अपार्टमेंट मधील एक पोलीस, शास्त्रीनगर येथील एक महिला व चिंतामणी अपार्टमेंट मधील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील शिंदोला येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ झाली आहे. काल छोरीया टाऊन शिप मधील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज संबंधित पोलीसांची अँटीजेन चाचणी करण्यात आली त्यात एक पोलीस पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता नागरिकांना नियमांची जाणीव करून देणाऱ्या कोविड योद्धयांनाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता निर्माण झाली आहे.
शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने ग्रामीण भागातही आपले जाळे निर्माण केले असून आज शिंदोळा येथे नव्याने कोरोनाची साखळी तयार झाली आहे. कोरोनाने ग्रामीण भागालाही लक्ष केले असून राजूर, चिखलगाव, गणेशपूर, घोन्सा व कोलगाव यानंतर शिंदोला गावतही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात केली याठिकाणीही एकामागून एक रुग्ण आढळून येत आहे. आज चार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ६७ झाली असून सक्रिय रुग्ण १६ झाले आहे. त्यापैकी १४ रुग्ण कोविड केयर सेंटरला तर २ रुग्ण यवतमाळ येथे उपचार घेत आहेत. आज एकूण ४६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ४२ निगेटिव्ह तर ४ व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत ८०५ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. आजचे धरून ६४ व्यक्तींचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत ११६४ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली असून त्यापैकी ४९ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.