WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना संकटामुळे वणी आगाराला यावर्षी झाले ६६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाची साथ भारतात आल्यानंतर ती वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या या लॉकडाउनचा कालावधी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता सतत वाढत गेल्याने देशाची अर्थव्यवस्था चांगलीच खालावली. उद्योग, व्यवसाय, कारखाने, कंपन्या याबरोबरच प्रवासी वाहतूकही बंद पडल्याने अर्थ व्यवस्थेचे पतन होत गेले. जलमार्ग, विमानमार्ग, लोहमार्ग व रस्तेमार्ग पूर्णतः बंद पडले. या मार्गांनी होणारी प्रवासी वाहतूकही संसर्ग वाढण्याच्या भीतीने बंद ठेवण्यात आल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येऊन उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यानंतरही प्रवासी वाहतुकीला मात्र परवानगी नाकारण्यात आली. कालांतराने प्रवासी वाहतूकीकरिता एसटी बसेस सुरु करण्यात आल्या खऱ्या पण त्याही जिल्ह्यातच चालविल्या गेल्या. प्रवासी मिळत नसल्याने बसफेऱ्याही मोजक्याच होऊ लागल्या. मोजक्या बसफेऱ्यांमुळे परिवहन महामंडळाला कवडीचाही फायदा होत नसल्याने महामंडळाने अनोखी शक्कल लढवून मालवाहतूक सुरु केली. त्यातही एसटी कर्मचाऱ्यांना रेगुलर ड्युटी मिळणे कठीण झाले. कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. ड्युटी नुसार पेमेंट हे धोरण अवलंबण्यात आले. काही दिवस कर्मचाऱ्यांना अर्धा पगार देण्यात आला. कालांतराने तोही बंद केला. २०१९ मध्ये चालक कम वाहक या दोन्ही पदांकरिता एकत्रित परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणही देण्यास सुरुवात झाली. पण अचानक कोरोना आडवा आला व या भरती प्रक्रियेवरच स्थगिती आणण्याची वेळ आली. चालक कम वाहक या पदांकरिता कित्येक मुलीही पात्र ठरल्या होत्या. गरिबीत हलाकीचे जीवन जगणाऱ्या मुली हातात स्टेरिंग पकडणार म्हणून त्यांचे चांगलेच कौतुकही करण्यात आले. पण या भरती प्रक्रियेवरच स्थगिती आल्याने त्या मुली अधांतरी पडल्या आहेत. नोकरी लागण्याचे त्यांचे स्वप्न भंगले असून बेरोजगारीचं जिनच त्यांच्या वाट्याला आलं आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पगार देणे कठीण झाले असतांना नव्याने निवड झालेल्यांना कुठे सामावून घ्यायचे हा प्रश्न महामंडळासमोर उभा झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवरच स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला. आज घडीला एसटी महामंडळ आर्थिक संकटाशी झुंजत असतांना एकट्या वणी डेपोला या काळात ६६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्यात आली. जिल्ह्यात मोजक्याच फेऱ्या होत असतांना महामंडळाने २२ मे पासून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. १३ जूनला वणी आगाराच्या बसला पाहिलं भाडं मिळालं. १३ जून ते १४ ऑगस्ट पर्यंत ३६ भाडे वणी आगाराच्या बसेसला मिळाले. त्यातून २ लाख ५१ हजार ८३२ एवढे उत्पन्न वणी डेपोला मिळाले. वणी डेपोचा मालवाहतुकीचा दर शासकीय नियमांप्रमाणे ३५ रुपये किमी एवढा अत्यअल्प राहिला. नंतर सुधारित दर ३८ रुपये किमी करण्यात आला. रिटर्न भाडे कमीतकमी २८ रुपये किमी प्रमाणे घेण्यात आले. रिटर्न भाडे मिळेस्तोर बस रिटर्न येत नसल्याने बसेसला उपडाऊन करण्याकरिता बराचसा कालावधी लागायचा. वणी डेपोतून मालवाहतूक बसेस या सांगली पर्यंत गेल्या आहेत.

२० ऑगस्ट पासून राज्यशासनाने आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. परंतु प्रवाश्यांचा कल प्रवासाकडे वळला नाही. २० ऑगस्टला आंतरजिल्हा एकच बसफेरी झाली ती ही वणी चंद्रपूर. तर आठ बसेस जिल्ह्यातच धावल्या. २० ऑगस्टचे एका दिवशीचे उत्पन्न ३७ हजार १७४ रुपये झाले. २१ ऑगस्टला दुपारी ३ वाजे पर्यंत चार आंतरजिल्हा बसेस सुटल्या तर तीन जिल्हा अंतर्गत बसेस सोडण्यात आल्या. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी बसल्यानंतरच बस बसस्थानकावरून सोडण्यात येते. बस स्थानकावरून जातांना व येतांना पूर्णतः सॅनिटायझरीन केल्या जाते. बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांचे नाव, पत्ते व मोबाईल नंबर लिहून घेण्यात येतो. एकंदरीत २२ प्रवासी बसमध्ये बसविण्यात येतात. त्यांच्या मिळकतीतून फक्त डिझलचाच खर्च निघतो, कर्मचाऱ्यांच्या पगारांची बोंबाबोंबच आहे. मागील वर्षी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत वणी आगाराला ७० लाख ७ हजार ७४२ रुपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले होते, तर यावर्षी २० ऑगस्ट २०२० पर्यंत ३ लाख ९४ हजार एवढेच उत्पन्न प्राप्त झाल्याने वणी आगाराला या वर्षी तब्बल ६६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही देणे कठीण झाले असल्याचे येथील व्यवस्थापकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रवास करण्यास कोणी धजावत नसून प्रवासी वाढल्यास नियमित बसफेऱ्या सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share