WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच, आज आणखी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून दिवसागणिक मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. आज २१ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हि आता पर्यंतची एका दिवसातील सार्वधिक रुग्ण संख्या ठरली आहे. मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगतच चालला आहे. त्यामुळे प्रशासना वरील ताणही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७४ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. ही सुधारित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून निव्वळ जिल्ह्यात नोंदी असलेल्या रुग्णांची ही एकूण संख्या आहे.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच चालला असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हादरून गेले आहे. ग्रामीण भागही हळूहळू कोरोनाच्या विळख्यात येऊ लागला आहे, तर शहरात कोरोनाचे तांडव सुरु आहे. शहरातील बहुतांश परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांची काळजी वाहतांना आरोग्य प्रशासनाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आज एकूण २६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २० पॉझिटिव्ह तर ६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज दोन रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी एक पॉझिटिव्ह तर एका व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत ११८० रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १६०८ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ६२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून एकूण २०० व्यक्तींचे अहवाल अप्राप्त आहेत. ५३ व्यक्तींना सध्या स्थितीत कोविड केयर सेंटरला भरती ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्णांवर कोविड केयर सेंटरला उपचार सुरु असून ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. तसेच अन्य पॉझिटिव्ह रुग्णांपैकी गृह विलीगीकरणात २५, चंद्रपूर येथे दोन, नागपूर येथे तीन, सावंगी मेघे येथे एक तर पांढरकवडा येथे दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात एकूण प्रतिबंधित क्षेत्र ५७ झाले असून त्यापैकी ४६ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात १५ तर शहरात ३१ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७४ झाली असून ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण हे भालर, कैलासनगर व शहरातील असल्याचे समजते. यामध्ये विठ्ठलवाडी येथील एक, भालर येथील तीन, कैलासनगर येथील चार, सर्वोदय चौक येथील सहा, जुना कॉटन मार्केट परिसरातील पाच, दीपक टॉकीज जवळील रामपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. शहरातील प्रसिद्ध असलेले मिष्ठान व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती नागपूर येथे पॉझिटिव्ह निघाल्याचे कळते. कोरोना शहरात उग्र रूप धारण करतांना दिसत असून आज एकाच दिवशी २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने ही आज पर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या ठरली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share