WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी विधानसभा क्षेत्रात उडाली आहे आत्महत्यांनी खळबळ, मायबाप सरकार द्या ना हो त्यांना जगण्याचं पाठबळ !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना ही जागतिक रोगराही भारतात पसरली व सुख समृद्ध जीवन वेदनादायक होऊन जीवनात आगतिकतेच्या झळा जाणवू लागल्या. गरिबीने उग्ररूप धारण करत लाचारीचं जिणं पदरी पाडलं. गरिबीचे चटके असह्य वेदना देऊ लागले. जीवन जगण्याची कला लुप्त होऊन मरणाचं कौशल्य अंगिकारतांना कित्येकांनी जीवनाच्या स्पर्धा परीक्षांमधून मरणाचे धडे गिरविले. निधड्या छातीच्या तरुणांनी व कुटुंब प्रमुखांनी लाचारीचं जीन धुडकावून जिंदगान्या त्यागल्या. जीवनाची आहुती देऊन मरण जवळ केलं. जगण्याचं सामर्थ्य उरलं नाही, मानसिकता दुबळी होत गेली, नैराशेने ग्रासलेल्या जीवनाला जगण्याचं पाठबळ मिळालं नाही. रोगराई अशी आली की जीवनाची लाही लाही झाली. जीवन जगण्याचे अख्खे मर्मच बदलून गेले, जिंदगीच लॉकडाऊन झाली. रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, हात मंजुऱ्याही मिळेनाशा झाल्या. कुटुंबाचा गाडा हाकणं कठीण झालं. परिस्थितीने लादलेल्या हालाकीच्या जीवनाचे चटके कुटुंबातील प्रत्येकालाच जाणवत होते. पण वेदनेचे हुंकार एकमेकांच्या कानापर्यंत पोहचतांना बराच वेळ झालेला असायचा. एकमेकांना आधार देतांना मनाचे खच्चीकरण होऊन कुटुंबावर आपला अतिरिक्त भार पडू नये या केविलवाण्या मानसिकतेमुळे कित्येकांनी मृत्यूला कवटाळले. तर कुटुंबाचा भार पेलतांना आपण अपयशी ठरलो आहे, ही उद्विग्नता असह्य झाल्याने कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी आत्महत्ये सारखे मार्ग निवडले आहे. कुठे आत्महत्या करतांना अंतःकरणाचे बोल कानावर पडले तर कुठे आपला आजार आपल्या कुटुंबाला वेदनादायी ठरू नये या मूक संवेदना अंतःकरणात बंधिस्त करून तरुण पिढींनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. कुठं बाप तर कुठं मुलगा, कुठे आई तर कुठे मुलगी, कुठे बहीण तर कुठे भाऊ परिस्थितीला बळी पडत गेले व मृत्यूला कवटाळत गेले. १०० वर्षातली ही रोगराई इतकी वेदनादायी ठरेल हे ऐकूनच आता थरकाप उडायला लागतो आहे. लॉकडाऊन लागल्या पासून वणी विधानसभा क्षेत्राच्या तीनही तालुक्यात आत्महत्यांची मालिकाच सुरु झाली आहे. तीनही तालुक्यात आता पर्यंत शेकडो व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. वणी मारेगाव व झरी या तीनही तालुक्यात दोन तीन दिवसा आड आत्महत्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या तीनही तालुक्यात आत्महत्यांचे सत्रच सुरु झाले असून हे तीनही तालुके आत्महत्यांचे हॉसस्पॉट ठरले आहेत. जीवन मृत्यू समोर गुडघे टेकतांना दिसत असून जीवनावर मृत्यू विजय मिळवितांना दिसत आहे. प्रत्येक जण मृत्यूला अशा प्रकारे कवटाळत आहे की, जगणं अगदीच नकोस झालं आहे. शासन प्रशासन व राजकीय सामाजिक संस्था गाव शहरात मार्गदर्शन शिबिरं घेत असतात, असच जीवन जगण्याचं सामर्थ्य घडवणारं एखादं शिबीर घ्या हो, ज्यातून नागरिकांना जीवन जगण्याचं बळ मिळेल. त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा देणारं शिबीर भरवा, त्यांच्या मध्ये जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन जागवा. जीवनाचं खच्चीकरण झालं आहे, प्रत्येक माणूस मानसिकदृष्ट्या खचला आहे, त्यांना सबळ मार्गदर्शनाची आवशक्ता आहे, त्यांना जगण्याचं पाठबळ देण्याची आवशक्ता आहे. त्यांच्यातला जगण्याचा आत्मविश्वास जागा करून त्यांच्या जगण्यात साकारात्मता आणण्याची आज नितांत गरज आहे. त्यामुळे आज त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना जगण्याचं पाठबळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक सामाजिक व राजकीय पुढाऱ्याने आत्महत्येचा मार्ग निवडणाऱ्या या निष्पाप जीवाचं रक्षण करून प्रत्येक कुटुंबाचा आधार हिरवण्यापासून वाचविण्याचे कार्य करावे. त्यांना उडणाऱ्या पक्षांचं उदाहरण द्यावं की, कितीही निसर्गाने आघात केले तरी पक्षी परिस्थिती पुढे लोटांगण न घालता, स्वतःमध्ये जगण्याचं सामर्थ्य निर्माण करतात व तिनका तिनका जमा करून आपलं घरटं तयार करतात, तसेच आपल्या चिमुकल्यांचं पूर्ण क्षमतेने लालनपालन करतात. परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही, संकटं टळतात, संकटावर मात करण्याची जिद्द जोपासली की, समृद्ध जीवन उदयास येतं. आत्महत्येचा विचार मनात आणण्याऐवजी जगण्याची जिद्द उरात पेटायला हवी. कोरोनाच संकट आज ना उद्या टळेल, पण सुखद जीवनाचा आनंद घेण्याकरिता आज आपल्याला खंबीरपणे जगणं आवश्यक असल्याच्या भावना आत्महत्येसारखे मार्ग निवडणाऱ्यांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. आत्महत्यांची ही मालिका खंडित करण्याकरिता मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना जगण्याचं पाठबळ देऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन जगविण्याची नितांत आवश्यक्ता आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share