WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून अन्य साथीचे आजारही बळावले आहेत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून डेंग्यू व टायफाईडच्या आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साथीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण चांगलेच वाढले असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. औषधी दुकानांमध्ये डॉक्टरांच्या पर्च्या हातात असलेल्या नागरिकांची रोजच रीघ लागलेली आढळून येत आहे. साथीच्या गंभीर आजरांनी शहरात कहर केलेला असतांना आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कित्येक वार्डांमध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून निर्जंतुकीकरणाची फवारणी झाली नसून बहुतांश परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरांनी तर हौदोस घातला असून आंगण परिसरात मुक्त संचार करणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. डुकरांच्या बंदोबस्ता करिता सुज्ञ नागरिकांबरोबरच पत्रकारांनीही आरोग्य विभागाचे लक्ष वेधले पण आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या डुकरांच्या लाखोंच्या संपत्तीचा वारसा आरोग्य विभागालाच मिळाला की काय, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. आरोग्य विभागाचे प्रतिबंधित उपायासंबंधीचे उदासीन धोरण साथीचे रोग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या आजाराने आता पर्यंत तालुक्यातील सहा रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णसंख्येचा आलेख तीव्र गतीने वाढत असून ११ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २९ दिवसांत तब्बल २७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. शहरात कोरोनाने थैमान घातले असतांनाच आता डासांपासून होणाऱ्या डेंग्यू मलेरिया व इतर आजारांनी सुद्धा नागरिकांना ग्रासले आहे. डेंग्यूचा डास शुद्ध पाण्यात निर्माण होत असल्याचे सांगितल्या जाते पण अशुद्ध ठिकाणीही डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. शहरातील वॉर्ड क्रं २ मध्ये एका व्यक्तीला डेंग्यू या आजाराने ग्रासले असून एकाला टायफाईड झाला आहे. तर कित्येक व्यक्ती साथीच्या रोगाने फणफणत आहे. घराघरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यानंतरही नगर परिषदेकडून डास निर्मूलनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना होतांना दिसत नाही. गवत, झाडे झुडपे, साचलेले गढूळ पाण्याचे डबके, उघड्या नाल्या असलेल्या परिसरात नगरपरिषदेच्या मशीन कडून फॅगिंग होणे अपेक्षित असतांना प्रत्येक्षात ही मशीन अनेक भागात फिरकतही नाही. तिचा प्रवास फक्त मुख्य मार्गाने दिसून येतो. वास्तविक शहराच्या आतमध्ये गल्लीबोळात डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो. मात्र आतील गल्लीबोळांपर्यंत फॅगिंग मशीन पोहचतच नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शिवशेनेतर्फे निर्जंतुकीकरणाचे कार्य करण्यात येत होते. त्यांचे निर्जंतुकीकरणाचे वाहन एक महिन्याआधी वार्डात फिरले होते. त्यानंतर वार्डात निर्जंतुकीकरणाची फवारणी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. दररोज डुकरांचा मुक्त संचार सुरु असतो. गल्ली अंगणात फिरणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. वॉर्ड क्रं २ हा वांझोटा वार्ड झाला असून या वार्डात असुविधा व अस्वच्छतेची भरमार पाहायला मिळत आहे. विठ्ठलवाडी येथील मुख्य रस्ता दुरुस्तीकरणाकरिता पूर्णतः खोदण्यात आला असून पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. मागील पाच महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरु असून अगदीच संत गतीने सुरु असलेले काम पावसाने पूर्णतः ठप्प पडले आहे. रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून नागरिकांच्या घरासमोर डबके साचले आहे. चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी घसरून कित्येक अपघात झाले आहेत. गल्लीबोळातून निघणारा मार्गही प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याने रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये डुकरे गटांगळ्या घालत असून डासांची उत्पत्ती होतांना दिसत आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती व संबंधित नगरसेवकांनी याबाबींकडे जातीने लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या असुविधा व आरोग्यविषयक निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share