कोरोना बाधितांची संख्या वाढतीवरच, आज आणखी १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून कोरोनाची परिस्थिती गंभीर वळण घेतांना दिसत आहे. दररोज आढळत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७३ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६८ झाली आहे. आज आणखी चार व्यक्ती कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २९५ झाली आहे. तालुक्यातील कोरोनाचे संकट गडद हातांना दिसत असून कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाबरोबरच नागरिकही चिंतेत आले आहे. कोरोनाचे संक्रमण तीव्र गतीने वाढत असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची लाट पसरल्याने जनता भीतीच्या सावटात आली आहे. आज २५ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ५ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली असून ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ७ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १५३७ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर २०४७ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी २७ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२२ स्वाबचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. आज १३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७३ झाली आहे. २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ९५ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये टिळकनगर येथील ३, साने गुरुजी चौक १, आर एच क्वाटर १, राजूर १, देशमुखवाडी १, चिखलगाव १, टागोर चौक १, सिंधी कॉलनी १, जैताई नगर १, विराणी टॉकीज एक तर विठ्ठलवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
विठ्ठलवाडी येथील रुग्णांची संख्या वाढतच असून आता पर्यंत याठिकाणी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. परिसरातील व्यक्ती कोरोनाला अगदी सहजतेने घेत असून प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बिनधास्त फिरतांना दिसत आहे. ही अफवा नसून सत्य परिस्थिती आहे. नागरिकांच्या बेसावध वागण्याने व परिसराबाहेर मुक्त वापरण्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिक लापर्वाहीचा कळस गाठतांना दिसत असून याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या मुक्त वावरण्याने परिसरातील इतर नागरिक धास्तीत आले आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर फिरणाऱ्यांवर अंकुश लावण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोना संक्रमणाला प्रतिबंध लावणे कठीण होऊन बसेल. नागरिकांनी स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येनार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.