आला होता पिकांना चांगलाच बहर, परतीच्या पावसाने केला कहर !
*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत असतो. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाच्या दृष्ट चक्रात अडकलेला शेतकरी संकटाचा सामना करतांना हतबल झाला असून हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके निसर्गाच्या लहरीपणाला बळी पडल्याने शेतकरी पुरताच हादरला असून आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची यावर्षीही वेळ येते की काय या विवंचनेत तो अडकला आहे. शेतकऱ्याचं आणि निसर्गाचं क्वचितच गणित जुळल्याचं पाहायला मिळतं. नाही तर निसर्गाची शेतकऱ्यांवर नेहमीच अवकृपा होतांना दिसते. सुलतानी संकटांना तोंड देतांना मानसिक यातना झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर जेंव्हा आस्मानी संकट कोसळतं तेंव्हा त्याचे अश्रू अनावर होतात व उभ्या पिकांची नासाडी पाहून मन हेलावून जातं आणी अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तरीही निसर्गाला कोसण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नसतो. कोरोनाच्या संकटामुळे मजूर व बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतातील उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागल्याने आधीच आर्थिक दुर्बल झालेला शेतकरी कसाबसा हिंमत जुळवून कर्ज, उसनवारी करून शेती पिकविण्यास तयार झाला, पण संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे म्हणतात ना, नेमकं तेच झाल, डवलाणे डोलणाऱ्या शेत पिकांवर अतिवृष्टीचा प्रकोप झाला, पराटीची बोन्डे तुटून पडली, राहिलेली बोन्डे काळवंडली, तसेच या अकारण पडलेल्या पावसाने कापसाच्या बोन्डाना व सोयाबीनच्या शेंगांना कोंब (मुळे) फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. कापसाची व सोयाबीनची पिके नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने संकटात सापडली आहेत.
गेल्या आठवड्यापासून परतीच्या सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरिपाची सर्व पिके धोक्यात आली असून नगदी पीक म्हणून लावण्यात आलेल्या कापसाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. कापसाची बोंडे पाण्यामुळे नासून जमिनीवर पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तो पूर्णपणे निराशेच्या गर्तेत सापडला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी भविष्याची स्वप्न रंगवत खरीप हंगामात मुख्य नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. यासाठी महागामोलांची बियाणे, रासायनिक खते, औषधी यावर हजारो रुपयांचा खर्च केला. वेळप्रसंगी अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज काढून पूर्णपणे पिकाची मशागत केली. मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाल्याने कापसाची लागवडही वेळेवर झाली. पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे झाली होती. त्यामुळे शेतकरी या वर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेवर होता. परंतु कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी ही सतत शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली असल्यामुळे याहीवर्षी सतत होणाऱ्या परतीच्या पावसामुळे खरीपाची पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत.
तोंडाला आलेला घास निसर्ग हिरावून नेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कापसाची बोंडे नासून जमिनीवर पडत आहेत तर सोयाबीनच्या शेंगांना, ज्वारीच्या कणसांना मोडे फुटून पीके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला लागली आहेत. आता जगावे कसे हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे.