राजूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडले खड्डे
शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजूर गावातील रस्त्यांची फारच दयनीय अवस्था झाली आहे. गावामध्ये जाणारे मुख्य रस्तेच खड्डेमय झाल्याने रस्त्यांवरून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राजूर फाट्यापासून गावात शिरणाऱ्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा मुरूम व माती पुरून डागडुजी करण्यात आली. पावसामुळे खड्ड्यातील मुरूम व माती वाहून गेल्याने रस्त्यांवरील खड्डे उघडे पडले आहेत. रात्रीच्या वेळेला वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये उसळून पडत आहेत. गावातील रस्तेच खड्ड्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून वेकोली प्रशासन व संबंधित अधिकारी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्यांवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजूर गावाकडे जाणाऱ्या व गावातून भांडेवाड्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची खूपच बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांवरून मार्ग काढतांना नागरिकांची चांगलीच कसरत होतांना दिसत आहे. रस्त्यांवर तयार झालेले खड्डे बुजविण्याकरिता मुरूम व मातीचा वापर करण्यात येत असून पावसामुळे ते टिकाव धरत नसल्याने थोड्याच दिवसांत खड्डे जैसे थे च होत आहे. वेकोली प्रशासन व संबंधित अधिकारी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे गांभीर्याने लक्ष देत नसून थातुरमातुर रस्त्यांची डागडुजी करण्यातच धन्यता मानत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच दुचाकी धारक खड्ड्यांमधून उसळून पडतांना दिसत आहे. पथदिवेही अर्धेधिक बंद रहात असल्याने नागरिकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने रस्त्यांवर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी न करता योग्यरीत्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वेकोली प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी गावातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांची रस्त्यांवरून होणारी धोकादायक कसरत थांबविण्याची मागणी राजूर वासियांमधून होत आहे.