WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

खनिज विकासनिधी अंतर्गत सुरु असलेली रस्ते व भूमिगत गटारांची कामे रखडली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरात खनिज विकासनिधी अंतर्गत रस्ते दुरुस्तीकरण व सांदर्यीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून काही भागांमध्ये मात्र रस्ते दुरुस्तीकरणाच्या नावाखाली फक्त रस्तेच खोदून ठेवण्यात आल्याने मागील सहा महिन्यांपासून या चिखलमय खडबडीत रस्त्यांवरून मार्ग काढतांना जीवाची कसरत होत असलेल्या नागरिकांचे आता कधी एकदाची या रस्त्यांची कामे पूर्ण होतील याकडे लक्ष लागले आहे. चिखलांमधून रस्ता शोधतांना आणखी किती दिवस कसरत करावी लागेल, हे कळायला मार्ग उरला नाही.

विठ्ठलवाडी परिसरातून एस.बी. लॉन मार्गे मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता मागील सहा महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम आधी संत गतीने सुरु होते तर आता पूर्णतः रखडले आहे. रस्ता पूर्णतः खोदण्यात आल्याने पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून काही ठिकाणी या रस्त्यांवर जल तलाव तयार झाले आहेत. या रस्त्यांवर साचलेल्या पाण्यांमध्ये डुकरे हौदोस करीत असून त्यांच्या अंग झडतीमुळे पादचाऱ्यांवर घाणपाण्याचे शिंतोडे उडत असल्याने ते चांगलेच तितर बितर होतांना दिसत आहे. त्याचबरोबर भूमिगत गटारांचीही कामे परिसरात सुरु असून वारंवार कंत्राटदार बदलत असल्याने गटारांची कामेही अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. भूमिगत गटारे निर्माणाकरिता नाल्या तर खोदण्यात आल्या पण सिमेंटचे पाईप टाकून त्यावर कांक्रेटची छपाई करण्याकरिता कित्येक दिवसांचा कालावधी लोटतांना दिसत आहे. वार्ड क्रं २ मधील बँक कॉलनी भागातील नागरिकांच्या घरासमोरील नाल्या भूमिगत गटारांच्या कामाकरिता सताड उघड्या करण्यात आल्या असून या नाल्यांमध्ये डुकरांचा हौदोस सुरु असून नाल्यांमध्ये डुकरे लोळत असल्याने परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. नाल्यांमध्ये लोळून घाणीने भरलेली डुकरे नागरिकांच्या घरासमोरून मुक्त संचार करतांनाच अंगाला झडती देऊन आवारामध्ये घाण करीत आहेत. सताड उघड्या नाल्यांमधील घाण पाण्यात उत्पन्न होणाऱ्या डासांमुळे साथीचे रोगही बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता हाती घेण्यात आलेली भूमिगत गटारे व रस्ते दुरुस्तीकरणाची कामे कित्येक महिने लोटूनही पूर्णत्वास आली नसल्याने याच कामांमुळे आता नागरिक असुरक्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. वार्ड क्रं. २ मधील विठ्ठलवाडी व बँक कॉलनी परिसरात दीर्घ कालावधी पासून संथ गतीने सुरु असलेली रस्ते व भूमिगत गटारांची कामे याच परिसराच्या आसपास राहणाऱ्या माजी नागराध्यक्षांबरोबरच आजी माजी नागरसेवकांच्याही दृष्टीस पडतात पण कुणीही संबंधित विभाग व कंत्राटदारांना जाब विचारण्यास धजावत नाही. रस्ते खोदल्याने रोडलगत रहात असलेल्या एका वकिलांच्या घरासमोरच जल तलाव निर्माण झाला आहे. तर खोदण्यात आलेल्या रस्त्यावर एका नामांकित वकिलांचे घर असून इतरांबरोबर त्यांनाही जाण्या येण्याचा त्रास होत असतांना कुणीही संबंधित विभागाकडे तक्रारी करून त्यांना धरेवर धरत नसल्याने कंत्राटदारही निश्चिंत झाले आहेत. या चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढतांना कित्येक दुचाक्या स्लिप होऊन पडल्याने दुचाकीस्वार जख्मी झाले आहेत. नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता वार्ड क्र २ मधील रस्त्यांची व भूमिगत गटारांची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी आता चांगलीच जोर धरू लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share