कॉटन मार्केट मधील भाजी मंडीतुन माल घेणाऱ्या चिल्लर विक्रेत्यांकडून कर्मचाऱ्यांची सक्तीची वसुली
कोरोनाच्या काळात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन होऊन नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये या उदात्त हेतूने शहरातील भाजी मंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या जागेत हलविण्यात आली. शेतकऱ्यांनी आणलेला व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या मालाचा याठिकाणी लिलाव होऊन होलसेल विक्रेते तो माल खरेदी करतात. नंतर शहर व ग्रामीण भागातील चिल्लर भाजी विक्रेते त्यांच्यापासून हवा तितका माल खरेदी करून नागरिकांना थोड्याफार फरकाने विकतात. काही भाजी विक्रेते एका ठिकाणी बसून तर काही गाव शहरात फिरून भाजी विकतात. कॉटन मार्केटमध्ये भाजी मंडी हलविल्यापासून माल लिलाव व खरेदी करणाऱ्यांना बाजार समितीतील कोणत्याही कर्मचाऱ्यांना माल खरेदी करण्याच्या रक्कमेवर आधारित पैसे द्यावे लागत नव्हते. परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून भाजी मंडीतुन माल खरेदी करणाऱ्या चिल्लर विक्रेत्यांना खरेदी केलेल्या मालाच्या रक्ममेवर आधारित पैसे कॉटन मार्केटच्या गेटवर उभे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावे लागत असल्याने चिल्लर भाजी विक्रेते चांगलेच संभ्रमात पडले आहेत.
कोरोना काळात फिजिकल डिस्टंसिंगच्या कारणास्तव शहरातील भाजी मंडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात विलीगीकरण करण्यात आले. भाजी मंडी याठिकाणी हलविण्यात आल्याने मालाचा लिलाव व खरेदीही येथेच सुरु करण्यात आली. होलसेल विक्रेत्यांनी माल खरेदी केल्या नंतर चिल्लर विक्रेते त्यांच्याकडून हवा तितका माल खरेदी करून नागरिकांना विकतात. माल खरेदी करणाऱ्या चिल्लर विक्रेत्यांना आता पर्यंत कोणालाही माल खरेदीच्या रक्कमेवर आधारित पैसे द्यावे लागत नसे. परंतु मागील ५-६ दिवसांपासून कॉटन मार्केटच्या गेटवर त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जात आहे. ८०० ते १००० रुपयांचा माल खरेदी केल्यास चिल्लर विक्रेत्यांकडून १० ते २० रुपये वसूल करण्यात येत आहे. पाच हजारांचा माल खरेदी केला तर ५० रुपये तर एक हजार रुपयांचा माल खरेदी केल्यास १०० रुपये गेटवर उभ्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावे लागत असून या रक्कमेची कोणतीही पावती त्यांना दिल्या जात नाही. त्यामुळे या सक्तीच्या वसुलीने चिल्लर विक्रेते संभ्रमात आले असून त्यांच्यामध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. कॉटन मार्केट प्रशासनातर्फे माल खरेदीच्या रक्कमेवर आधारित चिल्लर विक्रेत्यांकडून पैसे वसुलीचे नियम लावले असतील तर त्यांना तशी कर वसुलीची पावती द्यायला हवी. गेटवर उभे असलेले कर्मचारी मानमर्जीने पैसे उकळून थातुरमातुर नावे नोंदवत आहेत. यात विक्रेत्यांकडून एका दिवसांत एकूण किती पैसे वसूल करण्यात आले याचा बाजार समिती प्रशासनाला खात्रीदायक हिसाब मिळणार नाही. त्यामुळे नियमानुसार वसुली करायची झाल्यास विक्रेत्यांना कराची पावती देऊन एक पावती समितीकडे असायला हवी.
कोरोनाच्या या लॉकडाऊन काळात आधीच आर्थिक दुर्बलता आलेली असतांना व छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडल्याने बेरोजगार झालेल्यांनी भाजी विक्रीच्या व्यवसायाचा मार्ग निवडल्याने भाजी विक्रीतही स्पर्धा निर्माण होऊन धंदे मंदावले असतांना त्यांच्यावर अतिरिक्त भुर्दंड लादणे कितपत योग्य आहे, हेच कळायला मार्ग नाही. मालाचे भाव गगनाला भीडल्याने थोडी फारच मार्जिन ठेऊन धंदा करावा लागत असल्याने अल्पशा मिळकतीत परिवाराचा गाडा हाकावा लागत असतांना स्वतःचे पोट भरावे की, यांचे खिशे भरावे ही शोकांतिका एका चिल्लर भाजी विक्रेत्याने व्यक्त केली आहे. कॉटन मार्केट प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तसेच विक्रेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वसुलीची शहनिशा करून चिल्लर विक्रत्यांचे समाधान करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.