WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

योग्य पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने शहरातील भाजी बाजार आला रस्त्यावर

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातील भाजी बाजाराकरिता योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात न आल्याने भाजी बाजार रस्त्यावर आला आहे. नगर पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भाजी बाजाराच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. पालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे भाजी बाजार भरविण्याकरिता अद्यापही हक्काची जागा न मिळाल्याने भाजी पाल्यांची दुकाने रस्त्यांच्या कडेला लागतांना दिसत आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पालेभाज्यांची दुकाने लागलेली पाहायला मिळत आहे. शहरात नेमका भाजी बाजार कुठे भरतो हे सांगणे आता कठीण झाले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कुठेही दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीला तर अडथळे निर्माण होतच आहे, शहराचेही विद्रुपीकरण होतांना दिसत आहे. एकहाती सत्ता असतांना देखील भाजी बाजाराकरिता योग्य पर्यायी जागा उपलब्ध होऊ नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. खनिज उत्पादनात अग्रेसर असलेला वणी तालुका सोयीसुविधांच्या बाबतीत नेहमीच मागासला राहिला आहे.

मागील काही महिन्यांपासून भाजी बाजार भरविण्याकरिता पर्यायी जागेचा शोध घेणे सुरु आहे. परंतु जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही. नगर पालिके समोरील संकुचित जागेत मागील अनेक वर्षांपासून भाजी बाजार भरतो आहे. काही पालेभाज्यांची दुकाने तर नगर पालिके समोरील व मागील रस्त्यालगत थाटलेली दिसतात. शहराचं क्षेत्रफळ व लोकसंख्या सातत्याने वाढत असली तरी भाजी बाजारासाठी विस्तारित जागा मात्र अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरातील दैनंदिन भाजी बाजार व आठवडी बाजाराकरिता योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात न आल्याने भाजी बाजार रस्त्यावर आला आहे. कोरोना काळात तर भाजी बाजाराला ठीक ठिकाणी नाचविण्यात आले. काही दिवस कॉटन मार्केट मध्ये तर काही दिवस बस स्थानकात भाजी बाजार भरविण्यात आला. नंतर खाती चौक ते पहिल्या मोडक्या कमानी पर्यंतच्या रस्त्यालगत भाजी पाल्यांची दुकाने लावण्यात आली. त्यानंतर टिळक चौकात भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले. आता टिळक चौकापासून आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या व एसपीएम शाळेकडे वळणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाले भाज्यांची दुकाने लावण्यात येत आहे. काही भाजी विक्रेते नगर पालिकेजवळील आपल्या पूर्वीच्याच जागेवर पाले भाज्यांची दुकाने लावीत आहेत. वणी यवतमाळ रोडवरील साईबाबा मंदिरासमोरही पालेभाज्यांची दुकाने अगदी रस्त्याच्या कडेला लागली असतात. एकूणच पालिका प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने भाजी बाजार रस्त्यावर आला आहे. भाजी विक्रेत्यांना ज्या रस्त्यावर सोयीचे वाटते त्या रस्त्याच्या कडेला ते दुकाने लावून बसतात. कित्येक वर्षांपासून भाजी बाजाराला सुलभ जागा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. पण पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या वेळ काढू धोरणामुळे भाजी बाजाराच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडेच राहिले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे शहरातील भाजीबाजाराची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर आलेला भाजी बाजार शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरत असून भाजी बाजाराकरिता सुलभ पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येते की, ते ही आश्वासनातच विरते याकडे भाजी विक्रेत्यांबरोबरच जनतेचेही लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share