राजूर (इजारा) येथील समस्या आठ दिवसांत सोडविण्याचा मनसेचा ग्रामपंचायतेला अल्टीमेटम
तालुक्यातील राजूर (इजारा) या गावाला अनेक समस्यांनी घेरले आहे. गावातील प्राथमिक सोयी सुविधांकडेही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. गावात डेंग्यू, टायफाईड व मलेरिया सारखे साथीचे आजार बळावले आहेत. नागरिक या आजारांनी ग्रस्त होत असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र गावातील स्वच्छतेकडे पाठ फिरविताना दिसत आहे. गावातील पथदिवे बंद पडले आहेत, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. गावातील कचराकुंड्या फुटल्याने परिसरात कचऱ्याचे ढिगारे जमा झाले असून नाल्यांचीही साफसफाई करण्यात न आल्याने नाल्या तुडुंब भरल्या आहेत. साथरोग प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत गावात स्वच्छता ठेऊन वेळोवेळी निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या करणे आवश्यक असताना ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत आहे. ग्रामपंचायतेने गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास गावात जमा झालेला कचरा ग्रामपंचायतेसमोर आणून टाकण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजूर विभाग प्रमुख प्रदीप बांदूरकर यांनी ग्रामपंचायत सचिवांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
गावात अस्वच्छतेने कहर केला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होतांना दिसत आहे. ग्रामपंचायतेने गावात निर्माण झालेल्या आरोग्यविषयक व इतर समस्यांचे आठ दिवसात निराकरण करण्याचा अल्टिमेटम मनसेचे प्रदीप बांदुरकर यांनी सचिवांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. आठ दिवसात समस्या न सुटल्यास गावात जमा होऊन असलेला कचरा ग्रामपंचायतेसमोर आणून टाकण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.