जैताई मंदिरातर्फे करण्यात आला निष्ठावान कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोविड-१९ या आजाराची वाढत असलेली तीव्रता लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढविण्यात येत आहे. देशासह संपूर्ण जगात अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस तयार न झाल्याने जनमानसात भीतीचे सावट कायम आहे. एकापासून दुसऱ्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क व सामाजिक अंतर राखण्याचे नियम कायम ठेवण्यात आल्याने या काळात सण उत्सवांवर विरजण आले आहे. धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उत्सव सोहळे एकत्र येऊन साजरे करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे. शहरातील जैताई मंदिर येथे अनेक वर्षांची परंपरा लाभलेला नवरात्रीचा नव दिवस चालणारा धार्मिक उत्सवही कोरोनामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे गर्दी निर्माण होणारे धार्मिक कार्यक्रम न घेता जैताई मंदिर समिती तर्फे निष्ठापूर्वक कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता एका आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
अबोलपणे निष्ठापूर्वक कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा सत्कार सोहळा अगदी कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्यात आला. २१ ऑक्टोबरला आयोजित या सोहळ्यात जैताई नवरात्र अन्नपूर्णा विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या बेबीताई चौधरकर यांचा त्यांच्या पतीसह आशुतोष शेवाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जैताई अन्नछत्र विभागात समर्पित भावनेने सेवा देणाऱ्या गिरिजाबाई यांचा बाळासाहेब नगरवाला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता गर्दी निर्माण करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी घालण्यात आल्याने नवरात्र उत्सवात निस्वार्थ सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणारा सत्कार सोहळा आयोजित करून जैताई मंदिर समितीने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.