दसऱ्याला घेतलेल्या मोपेड दुचाकीला अपघात होऊन कुटुंब प्रमुख ठार
आयुष्य कधी कोणतं वळण घेईल याचा नेम नसतो. सुखा समाधानाचं जगणं सुरु होत. आनंदाची भरभराट होती. पती पत्नी व तीन मुलींचा सुखमय संसार सुरु होता. पण सुखाच्या संसारात दुःख डोकावून पहात असतं म्हणतात, याचीच प्रचिती आज आली. आनंदात जीवन जगणाऱ्या कुटुंबावर एकाएक दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंब प्रमुखाचं अपघाती निधन झालं. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नव्यानेच घेतलेली हिरो प्लेजर ही मोपेड दुचाकी चालविण्याचा सराव करीत असताना अचानक घेतलेले वळण वेकोली कर्मचाऱ्याला मृत्यूच्या वळणावर घेऊन गेले. पुनवट येथे रहात असलेले ६१ वर्षीय दिनकर उकिनकर हे कोळसा खदानीमध्ये कार्यरत होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते नव्यानेच घेतलेली मोपेड दुचाकी पुनवट घुग्गुस रोडवर चालविण्याचा सराव करीत असताना अचानक त्यांनी परत फिरण्याकरिता वळण घेतल्याने मागवून भरधाव येणाऱ्या कारणे त्याना जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचाराकरिता नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. कारही त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाल्याने कार चालक राहुल जिजापूरे (५९) रा. यवतमाळ हे किरकोळ जख्मी झाले.
सुखाचा संसार सुरु असताना कशाचीच उणीव व कमतरता भासली नाही. गुण्या गोविंदानं जीवन जगत असताना आयुष्याच्या सायंकाळी दुचाकी घेण्याची इच्छा निर्माण झाली. दसऱ्याचा मुहूर्त साधत मोपेड दुचाकी खरेदी केली. २५ ऑक्टोबरला दुचाकी खरेदी केली व २६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास नवीन दुचाकीची ट्रायल घेण्याकरिता दिनकर उकिनकर पुनवट वरून घुग्गुस रोडने निघाले. पुनवटकडे परत फिरण्याकरिता अचानक त्यांनी वळण घेतले असता मागवून भरधाव येणाऱ्या कारने MH २९ BR २३५२ त्यांच्या दुचाकीला MH २९ BC ७३४५ जबर धडक दिल्याने ते दुभाजकावर आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे रेफर करताना त्यांचे वाटेतच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली व पत्नी असा आप्त परिवार आहे. अख्ख आयुष्य कोळसा खदानीत कर्तव्य बजावल्यानंतर निवांत जीवन घालविण्याच्या वेळेला दुचाकी घेण्याची कल्पना सुचली व त्याच दुचाकीने घेतलेले वळण त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वळण ठरले.